आंदोलनाची नौटंकी करणार्‍या शेतकरी संघटनांचे कर्जमाफीप्रश्नी मौन

आंदोलनाची नौटंकी करणार्‍या शेतकरी संघटनांचे कर्जमाफीप्रश्नी मौन

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

शेतकर्‍यांचे कैवारी म्हणून ओळख असलेली शेतकरी संघटना शेतकर्‍यांच्या कांदा, दूध, ऊस आदी

प्रश्नांवर नेहमी सत्ताधार्‍यांवर आगपाखड करताना आंदोलनाची नौटंकी करणारी संघटना दोन लाखांवरील कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना सहा महिने झाले तरी कर्जमाफी मिळाली नाही, या प्रश्नावर गप्प का? असा सवाल तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केला आहे.

मुळा व भंडारदरा या दोन्ही धरणांचे पाणी असलेला राज्यातील एकमेव तालुका म्हणजे राहुरी तालुका! अशी या तालुक्याची ओळख आहे. पाट पाण्यामुळे हा भाग बागायती असला तरी इथला शेतकरी कष्टाळू आहे. परंतु सततचा दुष्काळ व त्यानंतरची अतिवृष्टी यातून सावरतो नाही तोच करोना महामारीचा उद्रेक, या सर्व नैसर्गिक आपत्तीने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले.

यातून सावरण्यासाठी त्याला आर्थिक आधार मिळण्यासाठी किंवा शेतीला आर्थिक हातभार लागण्यासाठी विधानसभा निवडणुकीत वचनपूर्ती जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे व उध्दव ठाकरे यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देऊ. शेतकर्‍यांना कुठेही वार्‍यावर सोडणार नाही, अशी जाहीर घोषणा केली होती. त्यानंतर ठाकरे मुख्यमंत्री झाले.

राज्यात महाआघाडी सरकारची सत्ता आली आणि केलेल्या घोषणेची त्यांना आठवण झाली. त्याप्रमाणे त्यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली पण, ही कर्जमाफी देताना त्यांनी हातचा राखून दिली असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

राहुरी तालुका हा साखरपट्टा असलेला तालुका आहे. इथल्या शेतकर्‍यांचे ऊस हे मुख्यपीक असल्याने बँकांनी त्यांना जादा कर्ज दिले. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकर्‍यांपेक्षा या शेतकर्‍यांची कर्जरक्कम जास्त आहे. परंतु सरकारने हा मुद्दा ध्यानात न घेता किंवा घेतला असला तरी जाणूनबुजून फक्त दोन लाखांपर्यंतच कर्जमाफी दिली. यामध्ये तालुक्यातील फार छोटे शेतकरी यामध्ये बसले.

मात्र, उर्वरित शेतकरी अद्यापही यापासून वंचित आहेत. त्यांना अजूनही नवीन पीककर्ज मिळालेले नाही. याउलट या खात्यावर व्याजाचा डोंगर वाढत चालला आहे. मग हे सर्व उघड्या डोळ्याने पाहणारी व नेहमी शेतकर्‍यांच्या संकटाला धावून येणारी शेतकरी संघटना नेमकी यावेळी गप्प का? असा सवाल शेतकरी करीत आहेत.

दरवर्षी उसाचे दर वाढवून मागणारी संघटना दरवाढ न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारी संघटना काद्यांचे भाव उतरले, दुधाचे दर पडले तरी शेतकर्‍यांना सोबत घेऊन राष्ट्रीय महामार्ग बंद करुन आंदोलन करणारी ही संघटना आज कर्जमाफीच्या प्रश्नावर तोंड का उघडत नाही, हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवून मूग गिळून बसली असल्याची टीका शेतकर्‍यांनी केली आहे.

तालुक्यातील प्रत्येक गावांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. तालुक्यात 100 मोठी गावे आहेत. या प्रत्येक गावात शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात शेतकरी खांद्याला खांदा लावून उभे असतात. बघता बघता खरीप गेला. आता रब्बी तोंडावर आलायं तरी देखील कर्जमाफी नाही. सरकारने आमच्या कर्जखाती दोन लाख रुपये जमा करावेत. बाकी आम्ही भरू, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. आता संघटनेने गप्प न बसता हाच मुद्दा घेऊन शेतकरी संघटनेने झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला जाग आणण्यासाठी शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहून वंचित शेतकर्‍यांना न्याय मिळून देण्याची मागणी शेतकर्‍यांची आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com