
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या टोळीला जेरबंद करण्यात शिर्डी पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे या मोटारसायकल चोरांचे मनोबल वाढले आहे. या मोटारसायकल चोरी करणार्या टोळीला पकडण्यात अपयशी ठरल्याने या टोळीला जेरबंद करणे शिर्डी पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
साईबाबांच्या शिर्डीत रोज एक नाही तर दोन तीन मोटारसायकल चोरीला जाणे हे कायमचे झाले आहे. गेल्या दोन दिवसांत चक्क चार मोटारसायकल चोरीला गेल्याच्या घटना घडल्याने शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे.
शिर्डी शहरात मोटारसायकल चोरी करणारी मोठी टोळी असून शहरातून चोरी केलेल्या गाड्या ह्या अन्य शहरात जाऊन विक्री करण्याचा सपाटा सुरू केला आहे. यात चोरून आणणारे वेगळे रॅकेट असून विक्री करणारी दुसरी टोळी आहे. अशा टोळ्यांना जेरबंद करणे अवघड नसतानाही शिर्डी पोलिसांना हे अपयश का येत आहे हे एक प्रश्नचिन्हच आहे.
मोटारसायकल चोरीचे प्रमाण साईबाबा संस्थानच्या दोन्ही रुग्णालये, मंदिर परिसर किंवा स्टँड परिसर अशा ठिकाणी अधिक आहे. या सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून या कॅमेर्यांत चोरही जेरबंद असल्याचे चित्रीत झालेले असतानाही पोलीस याकडे कानाडोळा का करत आहेत, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अशा रोजच्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी साईबाबांच्या पावनभूमीकडे लक्ष देण्याची गरज असल्याची भावना जनतेमधून व्यक्त होत आहे. शिर्डी शहरात दोनतीन वर्षांत सहसा शिर्डी पोलिसांना टोळी जेरबंद करण्यात यश आले नाही. तात्कालीन उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी देखील जाताना आपण दुचाकी टोळी पकडण्यात यश आले नाही, अशी खंत व्यक्त केली होती. ती खंत उपविभागीय अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पूर्ण करतील का? हे येणारा काळच सांगणार आहे.