
श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
विविध ठिकाणी पाळत राखून मोटरसायकलची चोरी करणार्या संशयितास पोलीस निरिक्षक ढिकले यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा पोलिसांनी सापळा लावून शिताफिने जेरबंद केले आहे. त्याला अटक करण्यात आले असून त्याच्याकडून 2 लाख 37 हजार रुपयांच्या चोरून नेलेल्या 7 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
रविंद्र विठ्ठल पवार (रा. साळवणदेवी रस्ता, श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 डिसेंबर रोजी श्रीगोंदा येथील रहिवाशी ललित सुभाष गुगळे यांची घरासमोरून अज्ञात चोरट्याने मोटरसायकल चोरून नेली होती. याबाबत गुगळे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला असता पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संशयित रविंद्र विठ्ठल पवार याने गुगळे यांची मोटरसायकल चोरली आहे व तो श्रीगोंदा बस स्थानकावर येणार आहे.
अशी माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा लावून संशयीतास शुक्रवारी (दि.13) ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील (एम. एच. 16 ऐ.के. 2666) मोटरसायकल व इतर गुन्हातील चोरी केलेल्या सहा मोटर सायकल असा 2 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविंद्र पवार याच्यावर यापूर्वी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.
त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, कर्माचारी बी. एल. खारतोडे, पठाण, नवसरे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार बी.एल.खारतोडे करत आहेत.