मुलाला अटक करण्यासाठी पोलिस आल्याचे पाहून आईचा हृदयविकाराने मृत्यू

मोठ्या पोलिस बंदोबस्तात महिलेचे शवविच्छेदन
मुलाला अटक करण्यासाठी पोलिस आल्याचे पाहून आईचा हृदयविकाराने मृत्यू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुका हद्दीतील चोरी प्रकरणातील माल वाहतूक केल्याच्या आरोपातील संशयित ट्रक चालकास ताब्यात घेण्यासाठी भल्या पहाटे पोलीस घरी आले. याचा धक्का सहन न झाल्याने वृद्ध मातेला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच तिचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी शवविच्छेदनास विरोध केल्याने मोठ्या पोलिस बंदोबस्तात व तणावपूर्ण वातावरणात या महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले.

श्रीरामपूर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुका पोलीस ठाणे हद्दीत एक बंधार्‍याच्या प्लेट चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील चोरीचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपासात आरोपीने एका मालट्रकमधून या मालाची वाहतूक केल्याचे समोर आले. त्यामुळे या ट्रक चालकास ताब्यात घेण्यासाठी काल गुरुवारी पहाटे पोलीस पथक शहरालगतच्या गायकवाड वस्ती येथील ट्रक चालकाच्या घरी गेले. या ट्रक चालकाची 62 वर्षीय आई आली. आपल्या मुलाकडे पोलीस आल्याचा धक्का तिला सहन झाला नाही. पोलिसांसमोरच त्या जागेवरच कोसळल्या. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने या महिलेला तात्काळ साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच हृदयविकाराने या महिलेचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी उत्तरीय तपासणी न करता घरी आणला. पोलिसही निघून गेले.

मात्र वरिष्ठांच्या सुचनेवरून पोलिसांनी पुढील काही समस्या उद्भवू नये व पोलिसांवर आरोप होऊ नये म्हणून शवविच्छेदन करून घेण्याचा आग्रह धरला. मात्र नातेवाईकांनी त्यास विरोध केला. श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सानप व तालुका पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवर नातेवाईक संतप्त झाले. नातेवाईक व पोलिसात चांगलीच शाब्दीक चकमक झाली. त्यावर पोलिसांनी पोलिसांनी अधिक कुमक मागवून शेवटी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी श्रीरामपूरच्या स्मशानभूमीत नेला. उत्तरीय तपासणी नंतर त्यांचेवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदनाच्या ठिकाणी एवढा मोठा पोलीस ताफा असल्याबाबत शहरात वेगळीच चर्चा रंगली होती.

विठाबाई काकडे असे मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कारवाई तालुका पोलिसांची टेन्शन मात्र शहर पोलिसांना

तालुका पालिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र नंतर उद्भवलेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे शहर पोलीस टेन्शनमध्ये दिसून आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com