अहमदनगर (प्रतिनिधी) -

केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने राबविण्यात येणार्या घरकुल योजनेत गत पाच वर्षात वेगवेगळ्या कारणामुळे 9 हजार 387 लाभार्थी अपात्र

ठरले आहेत. आता अपात्र ठरलेल्या या लाभार्थ्यांच्या जागेवर नवीन लाभार्थी निवडावे लागणार आहे. दरम्यान गत पाच वर्षात प्रधानमंत्री आवस योजना. रमाई आवास योजना, शबरी आवस योजना आणि पारधी आवास योजना यात मंजूर 69 हजार 910 घरकुलांपैकी 38 हजारी 945 घरकुल पूर्ण झाली असून पूर्णत्वाची टक्केवारी ही 44.99 टक्के आहे.

जिल्ह्यात 2016-17 ते 2020-21 असा घरकुल योजनेचा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. यात 86 हजार 564 घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यात 80 हजार 101 घरकुलांची नोंदणी झाली. पुढे जीओ टँगिंग, लाभार्थ्यांच्या बँक खाते व्हेरिफिकेशन होवून तसेच अपात्र लाभार्थी वगळून 69 हजार 910 घरकुलांना मंजूरी देण्यात आली.

या प्रक्रियेदरम्यान 9 हजार 387 लाभार्थी अपात्र ठरल्याने त्यांना वगळ्यात आले. अपात्र ठरण्याच्या कारणात शासकीय नोकरदार असणे, मयत, परागंदा होणे यासह अन्य कारणांचा समावेश आहे.

यासह 9 हजार 448 लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नव्हती. यामुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने पुढाकार घेवून 1 हजार 924 लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली. यात गावठण, बक्षीस पत्र, 99 वर्षाचा करार असणारे आणि खरेदी खत झाल्याने घरकुलांसाठी जागा उपलब्ध झाली.

मात्र, आजही 7 हजार 448 घरकुल लाभार्थ्यांकडे घरकुलासाठी जागा नाही. यासाठी शेती महामंडळाकडे 715, गायरान जमीनीसाठी 731, वन विभागाकडे 299, पाटबंधारे विभागाकडे 488, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 116, साखर कारखान्यांकडे 302, खासग शेतकर्यांकडे भाडोत्री 1 हजार 995, महाराष्ट्र शासनाच्या 813 जागांची मागणी करण्यात आलेली आहे. यातून जागा नसणार्यांसाठी जागा उपलब्ध करण्यात येत असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले.

सध्या जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 28 फेबु्रवारी दरम्यान जास्ती जास्त घरकुल उभारणीसाठी महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. यात आतापर्यंत 2 हजार 70 घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यासह अन्य शासकीय विभागाकडील जागा घरकुलांसाठी उपलब्ध करण्यासाठी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला असून यामाध्यमातून घरकुलांसाठी जागा उपलब्ध करण्यात येत आहे. यासह तुकडेबंदी, तुकडे जोड कायद्यामुळे अडचणी येत असल्याने अभियान काळात 20 गुंठ्याची जागांची खरेदी 1 गुंठे खरेदीपर्यंत खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

करोना आणि संप घरकुलांसाठी अडसर

जिल्ह्यात गत वर्षी करोनामुळे जवळपास घरकुलांची कामे ठप्प झाली होती. आता करोनाचा संसर्ग कमी झाला असून यामुळे कामे सुरू झाली. मात्र, महसूल विभागाने खडी आणि केशअर चालकांवर कारवाई केल्याने त्यांनी संप पुकाराला आहे. यामुळे ग्रामीण भागात आधीच वाळूची टंचाई असल्याने आता केशअर बंद झाल्याने कच मिळत नसल्याने घरकुलांची बांधकामे कशी कराची असा प्रश्न निर्माण झाला आहे.