
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
करोना संसर्गाचा धोका कमी होत नाही तोच आता जगभरात ‘मंकी पॉक्स’ या विषाणुजन्य आजाराने डोके वर काढले आहे. ‘मंकी पॉक्स’ च्या संभाव्य धोका लक्षात घेता शिर्डी विमानतळावरील सर्व प्रवाशांची तपासणी करण्यासाठी तेथे एक वैद्यकीय पथक कार्यरत राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहांमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, करोना पाठोपाठ आता ‘मंकी पॉक्स’ या विषाणूजन्य आजाराचे जगभरातील काही देशात लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील विमानतळावर येणार्या प्रत्येक प्रवासांची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. विमानतळावर एक पथक कार्यरत राहणार आहे. जिल्ह्यात या आजाराचा अद्यापपर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.