एटीएम कार्डची अदलाबदल करून शिक्षिकेच्या खात्यातून काढले पैसे

केडगावातील घटना
एटीएम कार्डची अदलाबदल करून शिक्षिकेच्या खात्यातून काढले पैसे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एका शिक्षिकेच्या एसबीआय बँकेच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांच्या खात्यातील 71 हजार 700 रूपये काढून घेत फसवणुक केली आहे. 12 जानेवारी, 2023 ते 16 जानेवारी, 2023 दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी 17 जानेवारी रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संध्यादेवी दगडुजी पाटील (वय 57 रा. आदर्शनगर, कल्याण रोड, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

संध्यादेवी यांचे एसबीआय बँकेच्या केडगाव शाखेत खाते आहे. त्यांना गुडघे दुखीचा त्रास असल्याने त्या पैसे काढण्यासाठी सदर बँकेचे एटीएम त्यांच्या ओळखीच्या पंकजा चंद्रकांत धर्मा (रा. जगन्नाथनगर, संदीप हॉटेलच्यासमोर, केडगाव) यांच्याकडे देत असतात. 12 जानेवारी, 2023 रोजी दुपारी संध्यादेवी यांनी एसबीआयचे एटीएम कार्ड नेहमी प्रमाणे पंकजाकडे पाच हजार रूपये काढण्यासाठी दिले.

तिने 15 ते 20 मिनीटांनी पाच हजार रूपये काढून आणुन पैसे व एटीएम संध्यादेवी यांना परत दिले. 16 जानेवारी रोजी संध्यादेवी या त्यांचे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेल्या तेव्हा एटीएम कार्ड एटीएम मशिनमध्ये चालत नसल्याने लक्षात आले. याबाबत त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता, त्यांच्या खात्यातून सुमारे 71 हजार 700 रूपये काढून घेतल्याचे त्यांना समजले.

संध्यादेवी यांनी पंकजाकडे चौकशी केली असता तिने सांगितले की, ‘केडगाव एसबीआय बँकेतील एटीएममध्ये पैसे काढायला गेली असता तेथे अंदाजे 25 ते 30 वयोगटाचे इसमाकडे एटीएम पैसे काढण्यासाठी दिले तेव्हा त्यांने पैसे काढून एक एटीएम माझ्याकडे परत दिले’, असे सांगितल्याने त्या 25 ते 30 वयोगटाच्या इसमाने त्याच्याकडे विश्वासाने पैसे काढण्यासाठी दिलेले एटीएम कार्ड अदलाबदल करून संध्यादेवी यांच्या एटीएम कार्डचा वापर करून 71 हजार 700 रूपये काढुन फसवणुक केली आहे.

आठ दिवसात दुसरी घटना

एटीएम कार्डची अदलाबदल करून बँक खात्यातून पैसे काढून घेतले असल्याची घटना 10 जानेवारी रोजी तोफखाना हद्दीत घडली होती. वृध्द व्यक्तीकडील एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांच्या बँक खात्यातून चार लाख 23 हजार रूपये काढून घेतले होते. या घटनेला आठ दिवस होत नाही तोच पुन्हा केडगावात शिक्षिकेकडील एटीएम कार्डची अदलाबदल करून बँक खात्यातून पैसे काढून घेत फसवुणक केली. काही ठराविक लोक या प्रकारच्या फसवणुकीत सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी एटीएम मशीन भोवती सापळा लावून अशा व्यक्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com