पैसे दुप्पट करून देणारी टोळी लोणी पोलिसांकडून जेरबंद

पैसे दुप्पट करून देणारी टोळी लोणी पोलिसांकडून जेरबंद

लोणी |वार्ताहर| Loni

पंधरा मिनिटात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी लोणी पोलिसांनी जेरबंद केली असून त्यांच्याकडून पाच लाखांची रक्कम जप्त केली.

बाबासाहेब वसंत सूर्यवंशी, रा. बळेगाव, ता. वैजापूर यांना 26 मे रोजी लोणी येथे बोलावून घेत पंधरा मिनिटात पैसे दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवून रद्दी पेपरची बॅग देऊन सुमारे 9 लाख 50 हजारांची रक्कम घेऊन पसार झालेल्या तिघांविरुद्ध लोणी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलिसांचे एक पथक आरोपींच्या मागावर होते.

गुन्हा घडतेवेळी आरोपीचा मोबाईल नंबर व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. मात्र आरोपी अनोळखी होता व त्याचा मोबाईल नंबर चोरीचा होता. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. मात्र पोलीस पथक गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले. सविंदणे ता. शिरूर येथून जितेंद्र ममता साठे वय 36, रा. वासुंदे, ता. पारनेर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून माहिती मिळवून इतर आरोपी अरुण सुरेश शिंदे, रा. वरवंडी फाटा, ता. संगमनेर, अन्वर अब्दूलखा पठाण, रा. नांदर, ता. पैठण यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून 5 लाखांची रोकड, दोन दुचाकी, दोन मोबाईल व तीन सिमकार्ड जप्त केले.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीचे सपोनि युवराज आठरे, उपनिरीक्षक योगेश शिंदे व पोलीस कर्मचार्‍यांनी साडेतीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर आरोपी जेरबंद करण्यात यश मिळवले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com