
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील अरणगाव दुमाला शिवारातील एका घरी चोरी झाली. आजोबांच्या आजारपणासाठी घरात ठेवलेली 1 लाख रूपयांची रोकड व दारात उभी असलेली मोटारसायकल चोरट्याने लंपास केली. मात्र हा चोरटा मेहुणाच असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्याच्याकडून रक्कम जप्त करत बेलवंडी पोलीसांनी पुन्हा तक्रारदारास सुपुर्त केली.
वैभव विनायक सुर्यवंशी (रा. वडगाव शिंदे, ता. श्रीगोंदा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी निलेश माणिक सातव (रा. अरणगाव दुमाला, ता श्रीगोंदा) यांनी तक्रार दाखल केली होती. 27 ऑगस्ट रोजी सातव हे आपल्या आजोबांच्या औषधोपचाराकामी शिरुर येथे गेले असता अज्ञात चोरटयांनी फिर्यादीचे बंद घराचे दरवाज्याचे कडीकोयंडा व कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन घरातील कपाटात आजोबांच्या औषधोपचारसाठी ठेवलेले 1 लाख रुपये व घरासमोरील मोटारसायकल चोरुन नेली. या गुन्ह्याचा तपास सह. निरिक्षक मारुती कोळपे करत असताना वडगाव शिंदोडी शिवारातील आरोपींनीच चोरी केलेली असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली.
चोरी करणारा संशयित वैभव विनायक सुर्यवंशी हा फिर्यादी निलेश माणिक सातव यांचा मेव्हणा असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस तपासात संभ्रम निर्माण झाला. परंतु त्यानेच गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. बेलवंडी पोलीसांनी यातील रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केली. हे पैसे सातव यांनी आजोबाच्या औषध उपचारासाठी आवश्यक असल्याचे पोलीसांना सांगीतल्यानंतर याबाबत न्यायालयातून आदेश करून घेऊन ही रक्कम फिर्यादीस सातव यांना परत देण्यात आली.