शाळा नकोच, ऑनलाईनच बरं

संमतीपत्र देण्यास पालकांची नकारघंटा । सोमवारपासून प्रत्यक्ष वर्ग
शाळा नकोच, ऑनलाईनच बरं

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा वर्गांची दारं सोमवारपासून उघडणार असली तरी पालकांनी मात्र शाळा नकोच, ऑनलाईनच बरं असा सूर आळविला आहे.

जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक न केल्याने अनेक पालकांनी ऑनलाईनचाच पर्याय निवडला आहे.

पालकांच्या संमतीपत्राशिवाय विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नसल्याने शाळा पूर्णपणे कितपत भरेल याबाबत शाळा व्यवस्थापनाच्या मनी शंका व्यक्त केली जात आहे.

करोना अनलॉकमधून शासनाने 9 वी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. हे वर्ग सुरू करताना अटी, नियम घालून दिले आहेत. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभाग वर्तवित आहे.

त्या पार्श्वभूमीवर सुरू होत असलेल्या शाळेत मुलांना पाठवयाचे नाही असा निर्णय पालकांनी घेतला आहे. पालकांचे संमतीपत्र असल्याशिवाय मुलांना वर्गात प्रवेश मिळणार नसल्याचा फतवा प्रशासनाने काढला आहे.

बहुतांश पालकांनी संमतीपत्र न देता ऑनलाईन वर्ग सुरू करण्याची सूचना शाळा व्यवस्थापनाला केली आहे. पालकांच्या या मागणीनंतर अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा सुरू करताना जिल्हा प्रशासनाने शाळांसाठी अनेक नियम टाकले आहेत. या नियमांचे पालन करतानाही शाळा व्यवस्थापनाला कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे काही शाळांनी वर्ग सुरू न करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

उपस्थिती ऐच्छिक, जेवणाची सुट्टी नाही

विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवरच अवलंबून असेल असे कलेक्टरांनी आदेशात नमूद केले आहे. याशिवाय प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी हा चार तासापेक्षा अधिक असू नये तसेच प्रत्येक वर्गाकरीता जेवणाची सुट्टी नसेल आणि दिवसाआड 50 टक्के विद्यार्थी वर्गात बोलविण्यात यावेत अशा सूचना कलेक्टरांनी आदेशात केल्या आहेत.

नियमावली

- शाळेत हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावी

- रोज होणार शाळांचे निर्जंतुकीकरण

- शिक्षकांना कोरोना निगेटिव्हचे प्रमाणपत्र सक्तीचे

- एका बाकावर एकच विद्यार्थी

- परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा कार्यक्रमांना बंदी

- प्रथमदर्शनी भागात कोरोना जागृतीचे फलक असावे

- मास्क कंम्पलसरी

- विद्यार्थी, शिक्षक, कर्मचार्‍यांची दररोज थर्मल स्क्रिनिंग

- बाहेरच्या व्यक्तीला शाळा आवारात प्रवेश बंदी

- पुस्तके, वही, पेन, पेन्सिल, वॉटर बॉटल अदलाबदली करू नये

- ऑनलाईन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठीही सुविधा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com