अत्याचाराच्या निषेधार्थ खंडाळ्यात कडकडीत बंद व निषेध सभा

अत्याचाराच्या निषेधार्थ खंडाळ्यात कडकडीत बंद व निषेध सभा

खंडाळा |वार्ताहर| Khandala

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील दोन वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. निषेध सभेसाठी उपस्थित नागरिकांमध्ये शेतमजुरी करणार्‍या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

खंडाळा ते रांजणखोल या रस्त्यालगत रमाबाईनगर परिसरात असलेल्या भास्कर ढाकू मोरे या 65 वर्षे वयाच्या इसमाने दोन वर्षीय बालिकेवर केलेल्या अत्याचाराचे काल गावात पडसाद उमटले. आरोपीला पोलिसांनी अटक करून गुन्हा जरी दाखल केला असला तरी ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. स्वयंस्फुर्तीने महिला, पुरुष गावात एकवटले व त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभेचे आयोजन केले.

या सभेत श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर, श्रीरामपूरचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, स्थानिक ग्रामविकास मंडळाचे राधाकिसन बोरकर, नवनाथ ढोकचौळे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अजीज इनामदार, संदीप विघावे, ग्रामपंचायत सदस्या मंजुषा ढोकचौळे, लहानबाई रजपूत, ताराचंद आलगुंडे, खंडेराव सदाफळ, सुरेश विघावे, महेश मरकडे, रामदास म्हसे यांची घटनेच्या निषेधार्थ भाषणे झाली. श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदीक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, बाबासाहेब दिघे यांनी पीडित बालिकेच्या घरी भेट दिली.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला व श्रीरामपूर वकील संघाला दिलेल्या सह्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, सदर घटनेच्या निषेधार्थ सर्व व्यापार्‍यांनी व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला. सदर आरोपीचा खटला जलदगती न्यायालयात चालवून लवकर निर्णय व्हावा. वकील संघातील कोणत्याही सदस्याने सदर खटल्यातील आरोपींकडून खटला चालवू नये, अशी विनंती करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com