
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
घरात घुसून मुलीचा विनयभंग करणारा आरोपी बाळकृष्ण पंढरीनाथ खांदवे (रा. सांडवा ता. नगर) याला येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. सहारे यांनी भा. द. वि. कलम 354 (बी) नुसार दोषी धरून तीन वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपी गंगाधर बाबाजी फलके (रा. निमगाव वाघा ता. नगर) व आरोपी खांदवे यांना भा. द. वि. 447 नुसार प्रत्येकी 500 रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी वकील मोहन पी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.
5 सप्टेंबर 2020 रोजी फिर्यादी ही घरी असताना आरोपी हे फिर्यादीच्या घरासमोर आले व फिर्यादीच्या परिवारास शिवीगाळ करू लागले व आमची जागा खाली करून टाका असे म्हणाले. आरोपींनी घराचे गेट वाकवून घरात घुसले. बाळकृष्ण पंढरीनाथ खांदवे याने फिर्यादीला मारहाण केली व फिर्यादीचा विनयभंग केला. त्यांनतर फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, फिर्यादीची आजी, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद व केसमध्ये आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपींना न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी सहा. फौजदार विलास साठे यांनी सहकार्य केले.