‘मोक्का’ गुन्ह्यातील श्रीरामपूरच्या पसार आरोपीला अटक

एमआयडीसीतील कंपनीत टाकला होता दरोडा
‘मोक्का’ गुन्ह्यातील श्रीरामपूरच्या पसार आरोपीला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात पसार असलेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला. विक्की उर्फ विकास विजय शिंदे (वय 23 रा. सुभाष कॉलनी, श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे.

नागापूर एमआयडीसीमधील झेन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतील सुरक्षा रक्षकांना मारहाण करून कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून तसेच कंपनीचे शटर कटावणीने तोडून कंपनीतील 17 लाख 50 हजार रुपये किमतीच्या चांदीचा मुलामा असलेल्या कॉपर पट्ट्यांचे 10 बॉक्स चोरून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करून चार सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली होती. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या आदेशान्वये नमूद गुन्ह्यातील आरोपीविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले असून आरोपी विक्की उर्फ विकास शिंदे हा अद्यापपर्यंत पसार होता.

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी शिंदे याचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर परिसरातून शिंदे यास ताब्यात घेत अटक केली. निरीक्षक कटके यांच्या सूचनेप्रमाणे उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापू फोलाने, भीमराज खर्से, देवेंद्र शेलार, रविकिरण सोनटक्के यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com