जनावरे रस्त्यावर मोकाट सोडल्यास कारवाई

श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाचा इशारा
जनावरे रस्त्यावर मोकाट सोडल्यास कारवाई

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगरपरिषद हद्दीतील मोकाट जनावरांचे मालकांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत, अन्यथा अशी जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकण्यात येतील, असा इशारा नगरपरिषदेचे प्रशासक अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिला आहे.

मोकाट जनावरे रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, चौकामध्ये, रस्ता दुभाजकावर मोकाटपणे फिरतात अथवा बसतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. काही वेळेस जनावरे रस्त्यात अचानकपणे आल्यास वेळप्रसंगी अपघात होऊ शकतात. आगामी काळात श्रीरामपूर शहरात सय्यदबाबा ऊरुस, रामनवमी उत्सव व डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. या उत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. बाहेर गांवाहून नागरीक, व्यवसाय व इतर कारणामुळे शहरात येतात. मोकाट जनावरे रस्त्यावर आढळून येत असल्याने त्यांचा परिणाम वाहतुकीवर होऊन जनावरे अचानकपणे रस्त्यात आल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोकाट जनावरांच्या मालकांनी त्यांची जनावरे स्वत:च्या जागेत बंदिस्त करुन ठेवावीत, जेणेकरून जनावरे रस्त्यावर येणार नाहीत. अशी जनावरे रस्त्यावर आढळून आल्यास नगरपालिका कायद्यातील तरतुदीनुसार दंड अथवा कैद अशा स्वरुपाची शिक्षा होऊ शकेल. तसेच मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई होऊ शकेल. त्यामुळे जनावरे मालकांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत, अन्यथा नगरपालिकेमार्फत अशी जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकण्यात येतील. सदर कोंडलेली जनावरे मालकांनी तीन दिवसांत प्रति दिवस 500 रुपये प्रमाणे दंडाची रक्कम भरुन सोडवून नेली नाहीत तर सदरची जनावरे पांजरपोळमध्ये टाकण्यात येतील. जनावरे मालकांनी अशी कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासक अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.