मोहटादेवी देवस्थान भाविकांसाठी सज्ज

मोहटादेवी देवस्थान भाविकांसाठी सज्ज

पाथर्डी|तालुका प्रतिनिधी| Pathardi

गेल्या आठ महिन्यांपासून कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले श्रीक्षेत्र मोहटादेवीचे मंदिर आजपासून उघडण्यात आले आहे.

त्यामुळे भाविक, व्यावसायिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दर्शनासाठी भाविकांनी मास्क, सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक भाविकांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार असून भाविकांनी दर्शनासाठी जास्त गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी केले आहे.

राज्यातील मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने दिवाळी, पाडव्यापासून परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमिवर श्रीक्षेत्र मोहटादेवी गड भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज करण्यात आला आहे. पूर्वतयारी म्हणून मंदिराचा पूर्ण परिसर देवस्थान समितीच्या कर्मचार्‍यांनी सॅनिटायीझ केला आहे. तसेच भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राहावे म्हणून दर्शन रांगेत सामाजिक अंतराचे पालन करत त्याप्रमाणे मार्किंग देखील करण्यात आले आहे.

प्रत्येक नागरिकांनी मास्क घालणे बंधनकारक असून विनामास्क असणार्‍यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मंदिरात प्रवेश करताना प्रत्येक भाविकांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. यासाठी कर्मचार्‍यांच्या ठिकठिकाणी मंदिरात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आरतीच्या वेळेस भाविकांनी जास्त गर्दी करू नये.

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून भाविकांसाठी मोफत असलेले प्रसादालय व भक्तनिवास पुढील आणखी काही दिवस बंदच ठेवण्यात येणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. कोव्हिडचे सर्व नियम पाळत मोहटादेवी दर्शनाची व्यवस्था देवस्थान समितीकडून पूर्ण करण्यात आली असून भाविकांनी दर्शनासाठी जास्त गर्दी करू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com