निर्बंधातच होणार मोहटादेवी मंदिरात नवरात्रोत्सव

प्रशासकीय बैठकीत प्रांतधिकार्‍यांचे आदेश
निर्बंधातच होणार मोहटादेवी मंदिरात नवरात्रोत्सव

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

राज्य सरकारच्या आदेशानुसार मोहटा देवस्थानमध्ये अनेक निर्बंध कायम ठेऊन नवरात्रोत्सव होणार असून नो मास्क,नो दर्शन या नियमांचे काटेकोर पालन करून मिरवणूक,महाप्रसाद वाटप,मंदिर परिसरात घटी बसणे यासह सार्वजनिक उत्सवांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

आगामी नवरात्रोत्सवपासून मोहटादेवी मंदिर देवस्थान खुले करण्यासाठी समितीच्या सभागृहात प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी देवदत्त केकाण तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, तहसीलदार शाम वाडकर,पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सरपंच एरिना पालवे, विश्वस्त यांच्यासह पंचायत समिती, नगरपालिका, आरोग्य विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन, वीज वितरण, पाणीपुरवठा आदी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

करोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मंदिर उघडणार असल्याने भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते असे गृहीत धरून संरक्षण व पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी प्रांताधिकारी केकाण म्हणाले, देवी दर्शनासाठी पायी चालत येणार्‍या भाविकांची संख्या पाहता पाथर्डी शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे, टपर्‍या, नवरात्रोत्सवासाठी पालिका व पोलिसांच्या संयुक्त कारवाईद्वारे हटविण्यात येऊन भाविकांसाठी रस्ता पूर्णपणे खुला करणार आहे.

यात्रा व अन्य उत्सवा संदर्भात शासनाकडून अद्याप पर्यंत कोणत्याही मार्गदर्शक सूचना जारी झाल्या नसल्याने मंदिर उघडण्याबाबत बैठकीतून विचारविनिमय करण्यात आला.नवरात्र उत्सवासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून आलेल्या आदेशानंतर अंतिम आराखडा तयार होईल. असे केकाण म्हणाले. बैठकीचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी केले तर आभार विश्वस्त अशोक दहिफळे यांनी मानले.

Related Stories

No stories found.