
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
आपल्या शेजारील जमीन परस्पर दुसर्यांनी विकत घेतली याचा राग येऊन एकाने जमीन घेणाराच्या डोक्यात तलवारीने वार करून गंभिर जखमी केल्याची घटना तालुक्यातील मोहटा येथे घडली. याप्रकरणी दोन महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश पोपट दहिफळे, शिवाजी पोपट दहिफळे, पोपट हरी दहिफळे, जालिंदर हरी दहिफळे, सिंधुबाई हरी दहिफळे व संगिता पोपट दहिफळे (सर्व रा. मोहटा ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या मारहाणीत मारुती लक्ष्मण दहिफळे (45, रा मोहटा ता पाथर्डी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मारुती दहिफळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोहटादेवीगड येथे मारुती दहिफळे यांचे स्टेशनरी दुकान आहे.
तर येथेच पोपट हरी दहिफळे यांचे सुध्दा नारळ प्रसादाचे दुकान आहे. त्यांच्या शेतजमिनी शेजारी असलेली भिमराव धायतडक यांची जमिन लक्ष्मण दहिफळे यांनी विकत घेतली. याचा पोपट हरी दहिफळे व इतरांना राग येऊन रविवारी (दि.11) दुपारी नवीन घेतलेल्या जागेवर लक्ष्मण दहिफळे शेडचे काम करत असताना संशयित गणेश दहिफळे, शिवाजी दहिफळे, पोपट दहिफळे, जालिंदर दहिफळे, सिंधुबाई दहिफळे व संगीता दहिफळे सर्व जण लक्ष्मण दहिफळे यांच्या जवळ येऊन शिवीगाळ करू लागले.
ते समजावून सांगत असताना संशयितांनी त्यांच्या हातातील तलवार, लाकडी दांडे व लाथाबुक्क्याने मारहाण करून लक्ष्मण दहिफळे यांना गंभिर जखमी केले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.