मोहटादेवी मंदिरात वेदमंत्रघोषात घटस्थापना

पासधारक भाविकांनाच दर्शनाची सुविधा
मोहटादेवी मंदिरात वेदमंत्रघोषात घटस्थापना

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर, आरती कुर्तडीकर यांच्याहस्ते सपत्नीक विधिवत पूजा करून पुरोहितांच्या वेदमंत्रांच्या जयघोषात घटस्थापना केली.

यावेळी विश्वस्त डॉ.ज्ञानेश्वर दराडे, अशोक विक्रम दहिफळे, अशोक भगवान दहिफळे, अजिनाथ आव्हाड, भीमराव पालवे देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भीमराव खाडे, संदीप घुले आदी उपस्थित होते. नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटादेवीची ख्याती आहे.देवीच्या साडेतीन शक्ती पिठांपैकी श्रीक्षेत्र माहुरच्या रेणुकामातेचे उपपीठ म्हणून मोहटा देवस्थानची देशभर ख्याती आहे.आज सकाळी मोहटे गावातून देवीच्या सुवर्णालंकारासह मुखवटा वाहनातून गडावर आण्यात आला.गावात मोहटा देवीच्या मुखवटा दर्शनासाठी स्थानिक व परिसरातील महिला भाविक सहभागी झाल्या होत्या.

पहाटेपासून नगर, बीड, औरंगाबाद,नाशिक,जालना आदी जिल्ह्याच्या भागांतून पायी चालत येणार्‍या भाविकांनी रस्ते फुलून गेले.मोहटादेवी गडावर येणारे चारही रस्ते प्रशासनाने बंद केले असून खाजगी वाहन व एसटी बसेस त्याठिकाणी वाहनतळावर उभ्या करून भाविकांना दर्शनासाठी पायी जावे लागत आहे.पाथर्डी - बीड या मुख्य रस्त्यावरील कमानीवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवून भाविकांची वाहने तेथेच लावून घेतली आहेत.त्यामुळे भाविकांना तीन किलोमीटर पायी चालून गडावर दर्शनासाठी जावे लागत आहे.पास असलेल्या भाविकांनाच गडावर प्रवेश दिला जात आहे.

मोहटादेवी गडावर ऑनलाईन पास शिवाय दर्शन दिले जात नाही.विना पास येणार्‍या भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने व मोहटा देवस्थान समितीने विशेष काळजी घेतली आहे.मानवावर आलेले करोनाचे महाभयानक संकट दूर होऊन पुन्हा एकदा सर्वाना चांगले आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना देवस्थान समितीचे अध्यक्ष मिलिंद कुर्तडीकर यांनी देवीकडे केली आहे.

हजारो भाविकांचे कळस दर्शन

करोनाच्या निर्बंधामुळे यावर्षी भाविकांना दर्शनासाठी ऑनलाईन पास सुविधा उपलब्ध करून दिली असून करोना लसीचे दोन डोस घेतलेल्या दररोज फक्त पाच हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. आज मात्र पास नसलेल्या हजारो भाविकांनी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मंदीर कळसाचे दर्शन घेत समाधान मानले.

Related Stories

No stories found.