मोहटादेवी देवस्थानच्या अध्यक्षपदी न्या. गोसावी

सुत्रे स्वीकारताच सपत्नीक घेतले दर्शन
मोहटादेवी देवस्थानच्या अध्यक्षपदी न्या. गोसावी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टच्या अध्यक्षपदी अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश सुनील श्रीधर गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली.

श्री जगदंबा सार्वजनीक ट्रस्टच्या घटनेतील तरतुदीनुसार अहमदनगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी नुकतीच जिल्हा न्यायाधीश सुनील श्रीधर गोसावी यांची नेमणूक केली. आज न्या. गोसावी यांनी सपत्नीक मोहटादेवीची विधिवत पूजा करून देवस्थानच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

यावेळी अध्यक्ष न्या.गोसावी यांनी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाशी संवाद साधतांना भाविक भक्तांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यास व पर्यावरणपूरक योजना राबविण्यास प्राधान्य देण्यात येईल तसेच सर्वांच्या सहकार्याने देवस्थानमार्फत विविध विकासकामे करण्यात येतील असे सांगितले. आगामी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नियोजनाबाबत माहिती घेऊन यावर्षी भाविकांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज असल्याने सुरक्षा, आरोग्य, सुलभ दर्शन व्यवस्था व उपाय योजनेचा आढावा घेण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत भाविक भक्तांच्या सुविधेकरीता शासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्था यांनी सहयोग करण्याचे आवाहन केले.

यावेळी देवस्थानचे विश्वस्त अँड. विजयकुमार वेलदे, अँड. सुभाष काकडे, सुधीर लांडगे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, भीमराव पालवे, अशोक दहिफळे, अजिनाथ आव्हाड यांचेसह भाविक, ग्रामस्थ व देवस्थानचे सेवक उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी स्वागत करून देवस्थानचे उपक्रम व नियोजित विकास कामांची माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com