सोमवारपासून गुरूजींची ‘शाळा’ भरणार

झेडपीचे आदेश : शिक्षकांना शाळा पूर्व तयारी सुरू करावी लागणार
सोमवारपासून गुरूजींची ‘शाळा’ भरणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पुढील शैक्षणिक वर्षे ऑनलाईन की ऑफलाईन याबाबत राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून स्पष्ट सुचना नाहीत. मात्र, ऐनवेळी धावपळ नको, यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने संयुक्त पत्र काढत सोमवारपासून शिक्षकांना शाळेत हजर होण्यास सांगितले आहे. या ठिकाणी शिक्षकांना शाळा पूर्व तयारी करण्यास सांगण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद शिक्षण समितीत झालेल्या चर्चेनूसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

करोना प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये 1 मे पासून 13 जूनपर्यंत सुट्टीचा कालावधी ग्राह्य धरण्यात आलेला आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्ष 14 जूनपासून सुरु करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत कोविडच्या प्रादुर्भावाची तत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन शासन स्तरावरून येणार्‍या आदेशानुसार शिक्षण संचालनालयाकडून सूचना काढण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत शाळा सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना नाहीत.

परंतू 14 जूनपासून शैक्षणिक वर्षे सुरू होईल, अशी शक्यता गृहीत धरून जिल्ह्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा पूर्व तयारीचा भाग म्हणून सोमवारपासून शाळेची व स्वच्छतागृहाची स्वच्छता, शाळांचे निर्जतुकीकरण, मास्क, सॅनिटायझर, साबण, हॅण्डवॉश, पाणी यांची उपलब्धता करून घ्यावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षीत शारीरिक अंतर राखणे शक्य व्हावे व एका वर्गात एका बेंचवर एक विद्यार्थी किंवा बैठक व्यवस्थेत किमान एक मीटर अंतर राहिल याची दक्षता घेण्यात यावी.

विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मदतीने सुविधा उपलब्ध करून द्यावी. खाजगी अनुदानित, विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या बाबतीतही शाळांमधील स्वच्छता, निर्जतुकीकरण करावे. बसेस, ऑटोमध्ये मुलांची गर्दी होऊ नये. म्हणून मुलांनी पायी, सायकलने किंवा त्यांच्या पालकांनी त्यांना शाळेत सोडावे या पर्यायांचा विचार करावा.

तसेच शिक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने अध्ययन अध्यापन पध्दतीचा अवलंब करण्यासाठी ई अभ्यासक्रम तयार करणे, विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय प्रश्‍नावली तयार करण्यात यावी, व्हॉटअप, गुगलमीटव्दारे अभ्यास तयार करण्यासाठी ई साहित्य करणे आदी कामे हे शाळा पूर्व तयारीत करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना दिवसांचा घरचा अभ्यास लिहून देणे ऑनलाईन अध्यापन इ. अशा विविध पध्दतींचा यांचा वापर करून देण्याचे काम सोमवारपासून करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या पातळीवर शाळेत येण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त सहीने पत्र काढण्यात आले आहेत.

काही ठिकाणी सक्ती ?

जिल्हा परिषदेने सोमवारपाासून शाळा पूर्व तयारीसाठी शिक्षकांना शाळेत येण्यास सांगितले आहे. मात्र, काही तालुक्यात सोमवारपासून शिक्षकांना सकाळी 10 सायंकाळी पाचपर्यंत सक्तीने हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, अशी सक्ती नसल्याचे जिल्हास्तरावरून सांगण्यात आले. यामुळे काही चुकीचा निरोप गेला असल्याचे यावरून दित आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com