मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणारी टोळी जेरबंद
सार्वमत

मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणारी टोळी जेरबंद

वडगावपान शिवारातील घटना; ग्रामस्थांकडून सिनेस्टाईल धुलाई

Arvind Arkhade

वडगावपान|वार्ताहर|Vadgavpan

संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात रात्रीच्या सुमारास मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणारी टोळी ग्रामस्थांनी पाठलाग करून रंगेहाथ पकडली. या चोरट्यांच्या टोळीकडे स्कॉर्पिओ गाडीसह चाकू - सुरे आढळून आले. ग्रामस्थांनी सिनेस्टाईल धुलाई करीत तिघा चोरट्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. एक चोरटा मात्र पसार झाला. काल गुरुवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मोबाईल टॉवरच्या 1 लाख 68 हजार रुपये किंमतीच्या 24 बॅटर्‍या तसेच 7 लाख रुपये किंमतीची स्कॉर्पीओ गाडी पोलिसांनी जप्त केली.

संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात शिवाजी दत्तात्रय थेारात यांच्या शेतजमीन गट नंबर 157 मध्ये असलेल्या एटीसी मोबाईल टॉवरजवळील बॅटर्‍या चोरटे काढत असल्याचा प्रकार गुरुवारी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास रहिवाशांच्या लक्षात आला. त्यानंतर सदर परिसरात राहणार्‍या रहिवाशांनी एकमेकांना जागे करीत त्याठिकाणी धाव घेतली. त्याचवेळी पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघा चोरट्यांपैकी तिघांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. मात्र एक चोरटा पसार झाला.

ग्रामस्थांनी चोरट्यांना सिनेस्टाईल चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. वडगावपान येथील युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश थोरात, प्रदीप थोरात, अनिल लोंढे, सलमान शेख, दत्तू थोरात, अंकुश मंडलिक, पप्पू थोरात यांनी चोरट्यांना पकडण्यासाठी धाडस दाखविले. या चोरी प्रकरणी विठ्ठल मच्छिंद्र वर्पे (रा. खंडाळा ता. श्रीरामपूर ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी विशाल उत्तम नारायणे (वय 25), संदीप कैलास कराळे (वय 25) दोघेही रा. शेंडी ता. जि. नगर, बंटी उर्फ आनंद मोहन वर्मा (वय 30) (रा. ग्वालीयर, मध्यप्रदेश हल्ली रा. बोल्हेगाव फाटा, अहमदनगर) व सोनू चंदेल (पूर्ण नाव माहीत नाही) या चौघांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 357/2020 भारतीय दंड संहिता 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपींकडून एटीसी मोबाईल टॉवरच्या अमर राजा 600 ए. एच. कंपनीच्या प्रत्येकी 7 हजार रुपये किंमतीच्या 1 लाख 68 हजार रुपयांच्या 24 बॅटर्‍या व 7 लाख रुपये किंमतीची स्कॉर्पीओ गाडी क्र. एम. एच. 14 ई. एच. 5475 हस्तगत केली.

पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर अधिक तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com