मोबाईल शौचालय कूचकामी, महिला संतप्त

शौचालयाअभावी नागरिकांची होतेय गैरसोय
file photo
file photo

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

शहरातील नवघरगल्ली परिसरातील सुलभ शौचालय पाडल्याने परिसरातील अनेक नागरिकांची दोन दिवसांपासून गैरसोय झाली आहे.

नगरपालिकेने या परिसरात तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या मोबाईल शौचालयाचा अनेक महिलांना वापर करता येत नसल्याने हे शौचालय कूचकामी ठरले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून शौचालयाचे काम सुरू न झाल्यास याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संगमनेर नगरपरिषदेने दोन दिवसांपूर्वी नवघर गल्ली परिसरातील इंदिरा गांधी गार्डन जवळील हे जुने शौचालय पाडले होते. याठिकाणी भाजी मार्केट बांधण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न असून यासाठी हे शौचालय पाडून टाकण्यात आले आहे.

या शौचालयाचा वापर अवघे चार-पाच कुटुंबीय करीत असल्याचे नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी सांगितले होते मात्र त्यांचा हा दावा फोल ठरला आहे. परिसरातील अनेक नागरिक या शौचालयाचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे.

नगरपालिकेने शौचालय पाडल्यानंतर परिसरातील नागरिक आक्रमक झाले होते. त्वरीत नवीन शौचालय बांधून आमची गैरसोय दूर करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. यावेळी त्यांनी प्रभागातील नगरसेवक किशोर टोकसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

स्वतःच्या फायद्यासाठी टोकसे यांनी सदर शौचालय पाडण्यास भाग पाडल्याचा आरोपही काही महिलांनी केला होता शौचालय न बांधल्यास आम्ही नगरसेवकाच्या घरी शौचास जाऊ, असा इशारा संतप्त महिलांनी दिला होता.

यानंतर नगरपालिकेने त्वरीत तात्पुरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली. या शौचालयात अनेक महिलांना बसताच येत नसल्याने या शौचालयाची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे.

शहरातील सर्वांना वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. नवघर गल्ली परिसरातील शौचालयाचा वापर अवघे चार ते पाच कुटुंबीय करत होते त्यांनाही नगरपालिकेने शौचालयासाठी अनुदान दिले असून त्यांनी शौचालय बांधले नसल्याचे नगराध्यक्षा सौ. तांबे यांनी सांगितले.

प्रत्यक्षात मात्र या नागरिकांची अवस्था वेगळी आहे. छोटी घरे व कमी जागा यामुळे हे नागरिक शौचालय बांधू शकत नसल्याचे चित्र आहे. नगरपालिकेने या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्वरीत शौचालय बांधण्याची गरज आहे.

माजी नगरसेवकांचा विरोध

संगमनेर नगरपालिकेने हे शौचालय पाडल्याने माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे व कैलास वाकचौरे यांनी पालिकेच्या या कृतीस विरोध दर्शविला आहे. शौचालय पाडण्याअगोदर पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. शौचालय पाडण्यास आपला विरोध असून नागरिकांच्या आंदोलनास आपला पाठिंबा राहील असे कर्पे यांनी सांगितले.

संगमनेर शहरात शौचालयाची सुविधा नसल्याने महिलांची गैरसोय होत आहे. महिला नगराध्यक्षा असतानाही अशी वेळ येणे हे दुर्दैवी असल्याचे वाकचौरे म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com