मोबाईल चोरणार्‍या दोघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कर्जतमध्ये कारवाई
मोबाईल चोरणार्‍या दोघांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रात्रीच्यावेळी घरासमोर झोपलेल्या लोकांचे मोबाईल चोरणार्‍या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

अविनाश बाळासाहेब घालमे (वय 20), रोहित उर्फ सोन्या दीपक काळे (वय 19 दोघे रा. शिंदा ता. कर्जत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील तपासकामी त्यांना कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

17 डिसेंबर रोजी मारूती गणपत चव्हाण (रा. कर्जत) हे घरासमोर झोपलेले असताना चोरट्यांनी त्यांचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला होता. चव्हाण यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या गुन्ह्याचा तांत्रिक तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला असता सदरचा गुन्हा अविनाश घालमे याने केल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी संतोष लोंढे, दीपक शिंदे, शंकर चौधरी, प्रकाश वाघ, रवींद्र घुंगासे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने घालमे याला कर्जत येथे अटक केली.

घालमे याने गुन्ह्याची कबुली देत सदरचा गुन्हा सोन्या काळे याच्या मदतीने केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सोन्या काळे याला शिंदा येथील राहत्या घरी सापळा लावून पकडले. आरोपींकडून चोरीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com