पावणे तीन लाखांचे मोबाईल चोरणारे ताब्यात

बीड जिल्ह्यातील तिघा अल्पवयीनांचा प्रताप
पावणे तीन लाखांचे मोबाईल चोरणारे ताब्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मिरजगाव (ता. कर्जत) येथील मोबाईल शॉपीचे पत्रे उचकटून चोरी करणारे तीन अल्पवयीन मुलांना 2 लाख 87 हजार किंमतीचे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच व रोख रक्कम या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा, नगरच्या पथकाने जेरबंद केले.

याबाबत अधिक माहिती अशी, शेखर बनसोडे (वय 29), व्यवसाय मोबाईल शॉपी, (रा. श्रीरामनगर, मिरजगाव, ता. कर्जत) यांच्या मिरजगाव येथील श्री गणेश मोबाईल शॉपीच्या छताचे पत्रे व पिओपी उचकटून मोबाईल शॉपीमध्ये प्रवेश करत विविध कंपनीचे 1 लाख 86 हजार रुपयांचे मोबाईल फोन, स्मार्ट वॉच व 1 लाख 88 हजार रुपये रोख असा 3 लाख 74 हजार रुपये किंमतीचा माल अज्ञात इसमांनी घरफोडी करून चोरून नेला होता.

या प्रकरणी बनसोडे यांनी मिरजगाव, पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांच्या पोलीस पथकाने तपास केला असता त्यांना बातमीदारामार्फत समजले की, ही चोरी केळसांगवी, ता. आष्टी, जिल्हा बीड येथील काही अल्पवयीन मुलांनी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास करत अल्पवयीन मुलांच्या ठावठिकाणा बाबत माहिती घेऊन गायरानवस्ती, केळसांगवी येथील तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी घरा जवळील कोंबड्याच्या खुराड्यात ठेवलेले गुन्ह्यातील 1 लाख 1 हजार रुपये रोख व 1 लाख 86 हजार रुपये किंमतीचे मोबाईल फोन व स्मार्टवॉच असा एकूण 2 लाख 87 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल काढून दिला. हा सर्व मुद्देमाल हस्तगत करुन मिरजगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील कारवाई मिरजगाव पोलीस स्टेशन करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com