मोबाईलद्वारे अभ्यासापासून 75 टक्के मुले वंचित

ग्रामीण भागात 20 टक्के पालकांकडेच अ‍ॅण्ड्रॉईड फोन
मोबाईलद्वारे अभ्यासापासून 75 टक्के मुले वंचित

गणेशवाडी|वार्ताहर|Ganeshwadi

करोना संकटामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. काही शाळांनी ऑनलाईन अभ्यास सुरू केला असला तरी सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल नसल्याने 75 टक्क्यांहून अधिक मुले शिक्षणापासून वंचित आहेत.

लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. तर अनेकांना रोजगार असला तरी दहा-बारा हजार रुपयांचा मोबाईल व त्यासाठीचे नेटपॅक घेणे परवडणारे नाही. खरवंडी केंद्रा अंतर्गत सोळा शाळा कार्यरत असून त्यामध्ये मराठी शाळा 11 तर माध्यमिक विद्यालये 5 आहेत. गणेशवाडी मधील माध्यमिक विद्यालयात 220 पैकी केवळ 50 विद्यार्थी तर जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत 95 पैकी 50 टक्के तर भोगे वस्ती 31 पट आहे पैकी 80 टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.

कारण 95 टक्के मुले आदिवासी समाजातील आहेत. ऑनलाईन शिक्षण प्रणाली ही शहरीभागात ठिक आहे परंतु ग्रामीण भागात ती पालकांची डोकेदुखी ठरत आहे. याठिकाणी जवळजवळ सर्वजण मोलमजुरी व शेती कामात व्यस्त असतात. त्यामुळे पालकांना मुलांसाठी वेळ मिळत नाही.

महागडा मोबाईल खरेदी करणे शेतमजुरांबरोबरच शेतकर्‍यांचीही ऐपत नाही. ज्या 15-20 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल आहेत त्यांची मुलेही अभ्यासाव्यतिरिक्त व्हिडीओ गेम खेळण्यासाठीच मोबाईलचा अधिक वापर करत असल्याचे दिसून येत असून त्यामुळे मोबाईलद्वारे शिक्षणाचे धडे ही सर्वच पालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com