एक कोटीचा दावा ठोकणारे लंके फकीर कसे?

मनसेचे भुतारे यांचा पारनेरच्या आमदारांवर निशाणा
एक कोटीचा दावा ठोकणारे लंके फकीर कसे?
आ. लंके

अहमदनगर (प्रतिनिधी) - सोशल मीडियातून बदनामी केल्याचा आरोप करून पारनेरचे आ. निलेश लंके यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना एक कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठविली आहे. यावर मनसेनेही त्यांच्यावर पलटवार केला असून स्वत:ला फकीर म्हणवून घेणार्‍या लंके यांच्याकडे एवढी संपत्ती आली कोठून? असा सवाल मनसेचे सचिव नितीन भुतारे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन उपस्थित केला आहे.

कोविड केअर सेंटरमध्ये आगळेवेगळे उपक्रम राबवून स्वत:ला रुग्णसेवेत गुंतवून घेतलेले आ. लंके चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, मनसेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष पवार आणि आ. लंके यांच्यात वाद सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी पवार यांनी आ. लंके यांनी आपल्याला फोनवर बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप केला होता. याची ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली होती. आ. लंकेंवर आरोप करणारा व्हिडिओही पवार यांनी प्रसारित केला होता. त्यामध्ये आ. लंके यांच्यासोबतच ते चालवित असलेल्या कोविड केअर सेंटरसंबंधीही आरोप केले होते. शिवाय आ. लंके यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. आता आ. लंके यांनी वकिलामार्फत मनसेचे पवार यांना एक कोटीच्या नुकसान भरपाईची नोटीस धाडली आहे. कोविड सेंटरच्या कामामुळे देश-विदेशात आपली चांगली प्रतिमा तयार झाली असून त्याला पवार यांच्या व्हिडिओमुळे धक्का पोहचला आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी आणि एक कोटींची नुकसान भरपाई द्यावी, असे नोटीसत म्हटले आहे. यावर मनसेचे भुतारे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे, स्वत:ला फकीर म्हणून घेणार्‍या लंके यांनी एक कोटी रुपयांचा हा दावा ठोकला कसा? करोनाच्या परिस्थितीत लंके यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. मात्र, मनसेच्या पदाधिकार्‍यांवर असा दबाव टाकणे मनसे कदापी खपवून घेणार नाही. मनसेचे पदाधिकारी पवार यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, स्पष्ट केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com