
शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi
सध्या देशात गाजत असलेल्या भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक असल्याने या विषयाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहावे. कुठल्याही धर्माचा चष्मा घालून याकडे बघितले नाही पाहिजे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी शिर्डीत दिली.
मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांचे शिर्डी शहरात आगमन होताच शिर्डी शहर मनसेच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. श्री. देशपांडे यांनी मध्यान्ह आरतीला साई दरबारी हजेरी लावत श्री साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री. देशपांडे यांचा साईबाबा संस्थानच्यावतीने विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी सत्कार केला. याप्रसंगी मनसेचे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष धुरी, शिर्डी नगरपंचायतचे नगरसेवक दत्तात्रय कोते, शिर्डी शहर संघटक विकी काबंळे, कैलास भुजबळ, रावसाहेब देशमुख, ज्ञानेश्वर जगदाळे, राहूल देशमुख, रूपेश देवकर, केशव उगले, कुणाल सांबारे, प्रसाद देशमुख, सुरेश सोनवणे, विजय कांचन, दिपक शेलार, दामोदर उमाप, राहुल देशमुख, विशाल मोहीते आदी मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना श्री. देशपांडे यांनी सांगितले की, श्री साईबाबांच्या दर्शनाने मनशांती लाभली आहे. भोंग्याच्या विषयाकडे कुठल्याही धर्माचा चष्मा घालून बघितले नाही पाहिजे या अनुषंगाने आमचे नेते राज ठाकरे यांचे पत्र सगळ्यांना घरोघरी देत आहोत. यामध्ये सर्व लोकांचा सहभाग आणि जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
मनसेचे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष धुरी यांनी सांगितले की, ज्यावेळी मनसेच्या जिल्हाप्रमुखपदी दत्तात्रय कोते यांची नियुक्ती केली त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षबांधणी करून जिल्ह्यात अतिशय उत्तम कामे केली आहेत. शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीत ते मनसेच्या चिन्हावर स्वतः निवडून आले आहेत. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे चार ते पाच उमेदवार निवडून येतील असा आत्मविश्वास दत्तात्रय कोते यांना असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्ते तयारीला लागले असल्याचे दत्तात्रय कोते यांनी सांगितले.