सुपा (वार्ताहर) -

पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक, पळवे खुर्द, जातेगाव, गटेवाडी, घानेगाव, हंगा या पाच गावांचा तीन दिवसांपासून शेती

पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे संतप्त झालेले मनसेच तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांच्यासह शेतकर्यांनी वीज वितरणचे अभियंता यांना घेराव घालत कोणतीही पूर्व सूचना न देता, जाब विचारला. अखेर महावितरणने नमते घेत या पाच गावांचा वीजपुरवठा सुरू केला.

वीजपुरवठा खंडित केल्याने पवार यांच्यासह शेतकर्यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्रेयश रूद्राकर यांच्या कार्यालयात आंदोलन करत करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मेटाकुटीला आला असताना यंदा मुबलक पाऊस होऊन केवळ विजेअभावी पाण्याची कमतरता भासू लागली आहे. याआधी जादा पावसाने ज्वारीचे पीक वाया गेले. थोड्याफार प्रमाणात कांदा, गहू, हरभरा, मका, घास, कडवळ आदी पिके दोन तीन पाण्यावर आली असताना महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकरी वीजबील भरायला तयार आहे.

फक्त त्यांना वेळ आणि ठराविक रक्कम टप्प्या टप्प्याने भरण्याची मुदत द्यावी, वीज पुरवठा सुरू केला नाही तर नगर- पुणे महामार्गावर सुपा येथील चौकात महाराष्ट्र नवनिर्माणसेनेच्यावतीने आंदोलन केले जाईल. याला महावितरण जबाबदार असेल असा इशारा दिल्यानंतर अभियंता रूद्राकर यांनी तात्काळ दखल घेऊन बंद केलेला वीजपुरवठा चालू केला. यावेळी मनसे सुपा शहर अध्यक्ष अक्षय सुरेश सूर्यवंशी, पळवेचे विद्यमान सरपंच गंगाराम कळमकर, उपसरपंच शिवाजी बापू पळसकर, राजाभाऊ जाधव, सुरेश कळमकर, राजू पळसकर, सागर जाधव, हंगा गावचे माजी सरपंच रामदास साठे, मुंगशीचे सुदाम दळवी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभियंत्यांकडून शेतकरी वेठीस!

सुपा महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता रूद्राकर यांनी शेतकर्यांना वेठीस धरले आहे. महावितरणकडून सात ते आठ वर्षे वीज बिल दिले जात नाहीत. आजही काही गावांनी वीजबिल पोहच झाली नाहीत. मात्र, वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. शेतकरी कळवळून सांगतात साहेब आम्ही टप्प्या टप्प्याने विजबील भरतो प्रत्येकी पाच एचपीला पाच हजार रुपये भरतो व पुढील रक्कम वेळेत भरतो. राज्यात कुठेही विजबील भराच असा तगादा लावला जात नसताना सुपा येथील अभियंत्याने शेतकर्यांचा अंत पाहिल्यास शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

- अविनाश पवार, मनसे तालुका उपाध्यक्ष पारनेर.