इंदोरीकर महाराज यांच्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी - आ. विखे
सार्वमत

इंदोरीकर महाराज यांच्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी - आ. विखे

Arvind Arkhade

आश्वी|वार्ताहर|Ashvi

समाज प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख यांच्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी होती, पण तसे घडले नाही. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. परंतु महाराजांच्या कामाला लोकमान्यता असल्याने, त्यांनी प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे. भविष्यातील लढाईसाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत असे आश्वस्त करून माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदिच्छा भेटीत दिलासा दिला.

संगमनेर तालुक्यातील ओझर येथील निवासस्थानी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. या दोघांनी बंद खोलीत अर्धा तास चर्चा केली. आ. विखे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत संवाद साधला. भगवद्गीतेची प्रत देऊन महाराजांनी आ. विखे पाटील यांचे स्वागत केले.

त्यानंतर माध्यमासमोर बोलताना आ. विखे पाटील म्हणाले की, महाराजांची सदिच्छा भेट घेण्यासारखी आलो होतो. त्यांच्याविषयी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत अधिक भाष्य करणार नाही. कायद्याला कायद्याचे काम करू द्यावे; परंतु महाराजांनी संत विचारांनी सुरू केलेले प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे हेच सांगण्यासाठी आज त्यांची भेट घेतली असल्याचे आ. विखे म्हणाले.

वास्तविक महाराजांनी दिलगिरी व्यक्त करूनही त्यांच्या विरोधात सुरू झालेल्या कायदेशीर प्रक्रियेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उतर देताना विखे पाटील म्हणाले की सरकारने महाराजांबाबत सहानुभूती दाखवायला हवी होती, पण सध्या सरकारच असंवेदनशील झाले आहे. महाराजांनी संत विचारांनी राज्यात सुरू केलेल्या प्रबोधनाच्या कार्याला लोकमान्यता मिळाली आहे.

त्यांनी सुरू केलेल्या कामाला आध्यात्मिक अधिष्ठान आहे. असेच काम त्यांनी भविष्यातही सुरू ठेवावे या कामाला आणि भविष्यातील लढाईसाठी त्यांना आमचे पाठबळ निश्चितच राहील असा दिलासा आपण त्यांना दिला असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक रामभाऊ भुसाळ, भागवतराव उंबरकर, विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे, रवींद्र गाढे, भाऊसाहेब शेजूळ, माउली वर्पे, जिजाबापू शिंदे आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com