संस्थान रुग्णालयाबरोबरच आश्रमातील इमारतीत बेडची उपलब्धता करा

संस्थान रुग्णालयाबरोबरच आश्रमातील इमारतीत बेडची उपलब्धता करा

आ. राधाकृष्ण विखे यांच्या अधिकार्‍यांना सूचना

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या रुग्णालयाबरोबरच आश्रमातील इमारतीत अधिकच्या बेडची उपलब्धता करा,

शिर्डी येथील कोव्हीड टेस्टींगचे सेंटर तातडीने सुरू करून टेस्टींगची संख्या वाढवा आणि नव्याने सुरू होणार्‍या कोव्हीड रुग्णालयात खासगी डॉक्टरांच्या मदत घेवून उपचार सुरु करण्याबाबतच्या सुचना आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधिकार्‍यांना दिल्या.

शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात कोव्हीड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, नितीन कोते, मंगेश त्रिभुवन, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलिस उपअधिक्ष श्री. सातव, आरोग्य आधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के यांच्यासह सर्व आरोग्य केंद्रांचे प्रमुख, मेडिकल असोशिएशनचे प्रतिनिधी तसेच औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते.

प्रारंभी आ. विखे पाटील यांनी तालुक्यातील कोव्हिड परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. आरोग्य केंद्रामध्ये होत असलेल्या कोव्हीड टेस्टच्या आकडेवारीत कमतरता असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात टेस्टींगचे प्रमाण अधिक वाढविण्याची सूचना त्यांनी सर्व आरोग्य अधिकार्‍यांना दिल्या.

कोव्हीड टेस्ट करताना रुग्णांची संख्या राहाता ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात होत असल्याने शिर्डी येथील टेस्ट सेंटर तातडीने सुरू करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. सद्य परिस्थितीत खासगी रुग्णालयांसह श्री साई संस्थानच्या रुग्णालयात ऑक्सीजन बेडसह अतिदक्षता विभागात उपलब्ध असलेल्या बेडचा आढावा त्यांनी जाणून घेतला. शिर्डी रुग्णालयासह श्री साई आश्रमातही बेडची संख्या वाढवून सुविधा उपलब्ध करण्याबाबत त्यांनी सुचित केले.

रेमडिसीवीर इंजेक्शनच्या निर्माण होत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी औषध विक्रेत्यांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले. यासंदर्भात आता जिल्हाधिकार्‍यांनीच सर्व नियोजन हाती घेतले आहे. जास्तीत जास्त इंजेक्शन तालुक्यात उपलब्ध होण्याच्यादृष्टीने पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

काही खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हीडचे उपचार सुरू असले तरी साई संस्थानच्या नव्याने सुरु होणार्‍या कोव्हीड सेंटरमध्ये खासगी डॉक्टरांची मदत खूप गरजेची आहे. यासाठी इंडियन मेडीकल असोशिएशनच्या पदाधिकार्‍यांसमवेत प्रांताधिकार्‍यांनी बैठक घेऊन याबाबत नियोजन करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.

ऑक्सीजनची कमतरता भासत असल्यामुळे ऑक्सीजन पुरवठा करणार्‍या पुरवठादारांशी संपर्क साधावा. तसेच तालुक्यात डोर्‍हाळे येथे रमेश पोकळे यांनी विकसीत केलेला ऑक्सीजन प्लॅन्ट प्रशासकीय कारणास्तव रखडला आहे. याबाबत आ. विखे पाटील यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून हा ऑक्सीजन तातडीने सुरू होण्याच्यादृष्टीने आवश्यक परवानग्या देण्याची मागणी त्यांनी केली.

नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी या बैठकीत शिर्डी येथील कोव्हीड सेंटरमध्ये इतर तालुक्यांतील रुग्णांनाही सरसकट उपचारासाठी दाखल करण्यास अधिकार्‍यांसमोरच विरोध केला. त्या त्या तालुक्यात सहकारी संस्था आणि मोठी रुग्णालये आहेत. तिथेच त्यांनी कोव्हीड सेंटर निर्माण करावेत. सर्वच तालुक्यातील रुग्ण शिर्डीत आले तर यंत्रणेवरही ताण पडेल. हे क्षेत्र अधिक संक्रमीत होईल, अशी भीती व्यक्त केली. कोव्हीड कारणाने व्यापार्‍यांचे आर्थिक संकट दूर झालेले नसल्याचे गांभीर्य त्यांनी निदर्शनास आणून दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com