कोव्हीड नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही

आ. विखे : लॉकडाऊन लावण्यापूर्वी मदत जाहीर करा
कोव्हीड नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही
आ. राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

कोव्हीडच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. टास्क फोर्सने आरोग्य सुविधांच्या मुलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवे.

लॉकडाऊन बाबत विचार करणार्‍या टास्क फोर्सच्या अधिकार्‍यांनी ग्रामीण भागातील समस्यांचा विचार केला आहे का, असा प्रश्न उपस्थित करून लॉकडाऊन लावण्यापुर्वी मदतीचे पॅकेज जाहीर करा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

शिर्डी येथे अधिकार्‍यांसमवेत कोव्हीड परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आ. विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. आघाडी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करून लॉकडाऊनच्या नावाखाली सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

सरकारच्या उदासिनतेमुळे रुग्णांना हॉस्पिटल उपलब्ध होत नाही, ऑक्सिजन सुविधा नाही. रेमडीसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. सरकारचे निर्णय फक्त कागदोपत्री असून अंमलबजावणी मात्र शून्य असल्यामुळेच सरकार सर्व पातळ्यांवर गोंधळले असल्याने कोणताही निर्णय सरकार घेूऊकत नसल्याकडे आ. विखे यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

कोव्हीड रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करून आ. विखे पाटील म्हणाले की, लॉकडाऊनचा निर्णय करणार्‍या टास्क फोर्सचे अधिकारी मंत्रालयात बसून सरकारला सूचना करीत असतील तर ते उचित नाही. या अधिकार्‍यांनी कोणत्या जिल्ह्यात जाऊन वास्तव परिस्थिती जाणून घेतली.

ग्रामीण भागातील प्रश्नांची मंत्रिमंडळात चर्चा होताना दिसत नाही. मंत्र्यांची विधाने फक्त शहरी भागाची काळजी करणारे दिसतात, असे सांगून शहरी भागाबरोबरच लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागाचे मोठे नुकसान होईल याची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

यापुर्वीच कोव्हीडमुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, सामान्य व्यापारी, बारा बलुतेदार, सलून चालक आर्थिक संकटात भरडला गेला आहे. आता पुन्हा त्यांच्यासमोर लॉकडाऊनमुळे निर्माण होणार्‍या समस्यांचा टास्क फोर्स विचार करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून या सर्व घटकांना मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आ. विखे पाटील यांनी केली.

कोव्हीड रुग्णांसाठी बेडची व्यवस्था पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी नर्सिंग रुमच्या नोंदणी केल्या असत्या तर बेडची उपलब्धता होऊ शकली असती. पण जिल्हा स्तरावरील यंत्रणा बेड, ऑक्सीजन, रेमडिसीवीर इंजेक्शन यांच्या उपाययोजनांमध्ये अडकून पडल्यामुळे इतर सुविधांचे सुनियंत्रण करण्यात प्रशासन अपयशी ठरले असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.

मंत्री थोरात यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना आ. विखे पाटील म्हणाले की, नियतीने आम्हाला विरोधी पक्षात बसायची भूमिका दिली असली तरी ती आम्ही यशस्वीपणे पार पाडत आहोत. पण तुम्हाला तर नियतीने मंत्री केले याचा राज्याला आणि जिल्ह्याला काय फायदा झाला, असा खोचक सवाल त्यांनी केला. आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी कोव्हीड काळात केलेल्या कामाचे ऑडीट मुख्यमंत्र्यांनी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com