संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

केंद्रात युपीए सरकार असतानाच बाजार समित्यांसाठी मॉडेल अॅक्ट आणणार्या काँग्रेस पक्षालाच आता आपल्या स्वत:च्या धोरणाचा विसर पडत

असल्यामुळे लोकांनाही आता या पक्षाचा विसर पडू लागला आहे. कृषी विधेयकाच्या संदर्भात केंद्र सरकार शेतकरी संघटनांशी चर्चेची तयारी दाखवित असतानाही काही मंडळी राजकीय फलित साध्य करण्यासाठी हे आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका भाजपाचे ज्येष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

संगमनेर येथील विश्रामगृहात आ.विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात भाष्य करताना त्यांनी विरोधी पक्षांवर कडक शब्दांत टीका केली. राज्यात शेतकर्यांचे प्रश्न राज्यपालांकडे मांडल्यानंतर राजभवनाचा राजकीय आखाडा करू नका, असे सल्ले देणारी मंडळीच आता शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रपतींकडे जाऊ लागली आहेत. आता राष्ट्रपती भवनही राजकीय आखाडा होतोय का? अशी शंका सामान्य माणसांच्या मनात उपस्थित होऊ लागली आहे.

केंद्रामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए सरकार असताना बाजार समित्यांसाठी मॉडेल अॅक्ट तयार करण्यात आला. तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्र्यांनी या मॉडेल अॅक्टची अंमलबजावणी सर्व राज्य सरकारांना करायला भाग पाडली होती. याकडे आ.विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्रातही हा कायदा स्वीकारताना त्यावर चर्चा झाली. परंतु केंद्राचेच धोरण असल्याने राज्याने या मॉडेल अॅक्टचा स्वीकार केला. आता मात्र, याच नेत्यांना आपण घेतलेल्या धोरणाचा सोयीस्कर विसर पडतोय, याचेच आश्चर्य वाटते. त्यामुळे लोकांनाही आता या पक्षांचा विसर पडू लागला असल्याचा टोलाही आ.विखे पाटील यांनी लगावला.

केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या संदर्भात शेतकरी संघटनांशी सकारात्मकदृष्टीने चर्चेची सर्व दारे खुली ठेवली आहेत. मात्र, काही मंडळी आपल्या राजकारणाचे राजकीय फलित साध्य करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप त्यांनी केला.

युपीएचे अध्यक्ष होण्याबाबत शरद पवारांच्या सुरू झालेल्या चर्चेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आ.विखे पाटील म्हणाले, एकेकाळी देशाचे नेतृत्व करणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाकडे पाहिले जात होते. आज मात्र, या पक्षाचे नेतृत्वच कमकुवत झाल्याचे आपण पाहातोय. हा पक्षच आता लयाला चालला आहे. पक्षाची अवस्था पाहून कार्यकर्त्यांनाही आता दु:ख वाटू लागले असेल. त्यामुळेच काँग्रेस पक्षानेच आता आत्मचिंतन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.