अस्तगाव |वार्ताहर| Astgav

जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. यातून गावपुढारी तयार करण्याचे काम सर्व तालुक्यांत सुरू असून

महसूलमंत्री वाळू माफियांवर काही बोलत नाही. वाळू वाहणारे महसूलमंत्र्यांचे बगलबच्चे आहेत. या बगलबच्चांना पोसण्याचे काम सध्या सुरू असल्याचा थेट आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या 59 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत आ. विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ होते. खा. डॉ. सुजय विखे पाटील, अण्णासाहेब म्हस्के, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, कार्यकारी संचालक अभिजीत भागडे, विखे कारखान्याचे कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे, संचालक मंडळ तसेच सभासद ऑनलाईन उपस्थित होते. या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभेपुढे मांडून मंजूर करण्यात आले.

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यामुळे अकोले तालुक्यातील निळवंडेच्या बंद पडलेल्या कालव्यांना चालना मिळाली. मात्र त्यांनी तळेगाव भागात एखादा कारखाना उभा राहील म्हणून विरोध केला. असा आरोप ना. थोरात यांचे नाव न घेता करत आ. विखे पाटील म्हणाले, निळवंडेसाठी आपण साईसंस्थानचे 500 कोटी मंजूर करवून घेतले होते. परंतु काही जण न्यायालयात गेले.

निळवंडेचे पाणी गणेश परिसरात आले तर हा परिसर सुजलाम् सुफलाम् होईल. राज्यात माफिया राज सुरू आहे. जिल्ह्यात वाळूने उच्छाद मांडला आहे. महसूलमंत्री वाळू माफियांवर का बोलत नाही. वाळू वाहणारे त्यांचेच बगलबच्चे आहेत. कोपरगाव, संगमनेरला हेच सुरू आहे. वाळूवर माफिया पोसवायचे आणि माफियांनी गावपुढारी, गुन्हेगारी पोसवायची! हे काम सुरू असल्याची टीका आ. विखे पाटील यांनी केली.

समन्यायी पाणी वाटपाच्या संदर्भात आपण न्यायालयीन लढाई लढतो आहोत. दावा प्रलंबित आहे. या समन्यायीमुळे गोदावरी, प्रवरा, मुळा खोर्यातील पाणी कमी झाले. त्याचे शेती व्यावसायावर विपरीत परिणाम झाले. कारखानेही अडचणीत आहेत.

खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, 30 वर्षापासुन बंद असलेले निळवंडेचे अकोलेतील काम पिचडांच्या सहकार्याने आ. विखे पाटील यांनी सुरू केले. ही मोठी उपलब्धी आहे. गणेश कारखाना विखे कारखान्याकडून काढून खाजगीकरणाचा काहींचा बेत आहे. गेल्या वर्षात राज्यातील 25 कारखाने बंद पडले. विखे पाटील घराणे जोपर्यंत राजकारणात आहे, तोपर्यंत सहकार संपणार नाही. या तालुक्यात पक्षावर राजकारण नाही तर विखे अॅलर्जीवर राजकारण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुकूंदराव सदाफळ म्हणाले, विखे पाटील साखर कारखान्याने गणेश कारखाना चांगला चालविला. या परिसराला वाचविले. यावेळी ऑनलाईन जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, बाळासाहेब जपे, विनायकराव कोते, सुभाषराव गमे आदींसह सभासदांनी चर्चेत सहभाग घेत विखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, गणेश कारखाना विखे पाटील कारखान्यानेच चालवावा असा ठराव मांडला. संचालक अॅड. रघुनाथ बोठे यांचेही भाषण झाले. आभार उपाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी मानले.

विखे, पिचडांच्या अभिनंदनाचा ठराव

या सभेत निळवंडे धरणाला चालना मिळाल्याबद्दल विखे पाटील यांनी मागणी लावून धरल्याने सरकारने निधी मंजूर केला. माजी मंत्री पिचड यांनी अकोल्यातील कालव्याच्या कामातील अडथळे दूर केल्याने या दोन्ही माजी मंत्र्यांचा या सभेत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.