शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

उत्तर नगर जिल्ह्याच्या जिरायती भागाला वरदान ठरणार्या निळवंडे धरण कालव्यांच्या कामांसाठी अर्थसंकल्पात

365 कोटी रुपयांचा निधी मंजुर झाल्याने निधी अभावी रखडलेल्या कालव्यांच्या कामास आता गती मिळेल, असा विश्वास भाजपाचे जेष्ठनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

आ. विखे पाटील म्हणाले की, यावर्षीच्या अर्थसंकल्पात निळवंडे धरण कालव्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेवून या कालव्यांच्या कामसाठी 500 कोटी रुपयांची तरतुद करावी, अशी मागणी आपण केली होती. याबाबतचे प्रस्तावही जलसंपदा विभागाने सादर केले होते. केलेल्या मागणीनुसार 365 कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजुर झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

यापुर्वी कालव्यांच्या कामांसाठी मागील भाजपा सरकारकडून निधी उपलब्ध करुन घेतानाच, प्रकल्पग्रस्तांच्या समस्याही सोडविण्यात यश आले. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या सहकार्याने व माजी मंत्री जेष्ठनेते मधुकरराव पिचड यांच्या पुढाकाराने अकोले तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतक-यांना विश्वासात घेवून त्यांचे प्रश्न प्रशासकीय स्तरावर मार्गी लागले होते.

धरणाच्या मुखापाशीच रखडलेल्या कालव्यांच्या कामास त्यामुळे गतीने सुरुवात झाली. मंध्यतरीच्या काळात निधी अभावी ही कामे थांबली होती. आता अर्थसंकल्पात निधीची तरतुद झाल्याने या कालव्यांच्या कामाला आता पुन्हा सुरुवात होईल.

कालव्यांच्या कामासाठी अन्य तालुक्यातही भुसंपादनाचे काम आता जलसंपदा विभागाने पुर्ण केले आहे. त्यामुळे या भागातही आता कालव्यांची कामे सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.