नगर-मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी आ. विखे रस्त्यावर उतरणार

नगर-मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी आ. विखे रस्त्यावर उतरणार

लोणी |प्रतिनिधी| Loni

नगर मनमाड या मार्गाची अवस्था अतिशय भीषण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी

रस्त्यातील खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीच्या झालेल्या रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात आ. विखे पाटील यांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना या मार्गाच्या परिस्थितीचे फोटो आणि व्हीडीओची सीडी पत्रासोबत पाठवून या रस्त्याच्या दुरवस्थेकडे विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आहे.

आ. विखे पाटील यांनी सांगितले की, नगर-मनमाड हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील वाहतूक या मार्गावर सुरू असते. परंतु नुकत्याच झालेल्या पावसाने या मार्गावर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे वाहतुकीसाठी अडथळा ठरत असून या खड्ड्यांकडे स्थानिक पातळीवर अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

वाहतुकीसाठी हा रस्ता आता सुरक्षित राहिला नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊ लागल्याने प्रवाशांसाठी वेळेचा व पैशाचा अपव्यय व वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची बाब पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली आणि याचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.

मात्र जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना रस्त्यांच्या कामासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली असून शिर्डी विधानसभा मतदार संघातून जाणारा नगर-मनमाड राज्य मार्गाच्या कामाची निविदा मंजूर असतानाही या रस्त्याच्या कामाला कुठलाही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सदर वस्तुस्थिती लक्षात यावी म्हणून आ. विखे यांनी रस्त्यांतील खड्डे वाहतुकीची अडचण या बाबी फोटो आणि शुटींगच्या माध्यमातून एका सीडीद्वारे मंत्री अशोकराव चव्हाण यांना पत्रासोबत पाठविली.

नगर-मनमाड रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वी आपण विभागातील अधिकार्‍यांना वेळोवेळी पत्र दिले. पण रस्त्याच्या कामाला सुरूवात होत नाही हे दुर्दैव आहे. प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा कळत असेल तर आता कोणतीही पुर्वसूचना न देता कोणत्याही क्षणी नगर-मनमाड मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा आ. विखे पाटील यांनी पत्राद्वारे दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com