लोणी |वार्ताहर| Loni

राज्यात सुरू करण्यात आलेली हवामानावर आधारित पीक विमा योजना खासगी कंपन्यांच्या ताब्यात गेल्याने शेतकर्यांऐवजी कंपन्याच योजनेच्या लाभार्थी

बनल्या असल्याची खंत माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

राहाता तालुक्यातील गोगलगाव विविध कार्यकारी संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते झाले. ज्येष्ठ नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन नामदेव पांढरकर, व्हा. चेअरमन रावसाहेब मगर, सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके, तालुका विकास आधिकारी उत्तम गुळवे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आ. विखे पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा म्हणून दोन वेळा कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. सेवा सोयायटीच्या माध्यमातून या योजनेचा लाभ पात्र शेतकर्यांना मिळाला असला तरी कर्जमुक्तीच्या जोखडातून अद्यापही सर्व शेतकरी मुक्त झालेले नाहीत.

कर्जमाफी ही सातत्याने मिळेल, अशी परिस्थिती आता नाही. यासाठीच राज्यात कृषीमंत्री म्हणून काम करीत असताना शेतकर्यांसाठी हवामानावर आधारित पीकविमा योजनेची अंमलबजावणी सरकारच्याच कृषी विमा कंपनीतून सुरू करण्यात आली होती.

नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकांच्या होणार्या नुकसानीची भरपाई या योजनेतून शेतकर्यांना मिळाली. हा दृष्टीकोन प्राधान्याने ठेवण्यात आला होता. काळाच्या ओघात ही योजना आता खासगी विमा कंपनीच्या ताब्यात गेल्याने शेतकर्यांना लाभ कमी आणि कंपन्यांचा फायदा अधिक होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ लागल्या आहेत.

यासाठी या योजनेचा पुन्हा एकदा गांभिर्याने फेरविचार करून पीकविमा योजनेतून शेतकर्यांना फायदा कसा होईल हे पाहण्याची गरज निर्माण झाली असल्याचे आ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

जिरायती आणि बागायती भागातील पीक पध्दतीत आता नैसर्गिक कारणाने बदल होत आहेत. यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकर्यांना मार्गदर्शकाची भूमिका बजावण्याची अपेक्षा व्यक्त करून आ. विखे पाटील म्हणाले की, प्रयोगशाळेतील संशोधन शेतकर्यांपर्यंत पोहचावे हीच कृषी विज्ञान केंद्र काढण्याची संकल्पना होती.

शेती क्षेत्रातील बदलांचा तरुणांनी आता स्विकार करावा यासाठी प्रवरा कृषी केयर अॅप सुरू करण्यात आले असून या माध्यमातून गटशेती, फार्मर्स प्रोट्युसर कंपन्यांचा प्रयोग आपल्या भागामध्ये यशस्वीपणे सुरू केल्यास तो कृषी क्षेत्राला पुरक ठरेल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, सहाय्यक उपनिबंधक जितेंद्र शेळके यांची भाषणे झाली.