व्यावसायिक शिक्षकांना नियमित सेवेत सामावून घ्या
सार्वमत

व्यावसायिक शिक्षकांना नियमित सेवेत सामावून घ्या

माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Arvind Arkhade

लोणी|वार्ताहर|Loni

राज्यातील 500 शासकीय शाळांमधून व्यावसायिक विषय शिकविणार्‍या शिक्षकांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. दुर्गम व आदिवासी भागात कौशल्य शिक्षणाच्या दृष्टीने या शिक्षकांचे असलेले योगदान लक्षात घेऊन व्यावसायिक शिक्षकांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार करावा आणि इतर शिक्षकांप्रमाणे त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याची मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

व्यावसायिक शिक्षक महासंघाच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले होते. या मागण्यांबाबत आ. विखे पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना सविस्तर पत्र देऊन या शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सहानुभूतीने विचार करण्याबाबत सूचित केले. 2014-15 पासून राज्यातील 500 शासकीय शाळांमधून व्यावसायिक शिक्षकांद्वारे इयत्ता 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना इतर सामान्य विषयांप्रमाणेच मुख्य विषय म्हणून व्यावयायिक विषय शिकविले जातात.

दुर्गम व वंचित आदिवासी समाज घटकांमधील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम या माध्यमातून होत असल्याने स्वयंरोजगाराच्या दृष्टीने शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याकडे आ. विखे पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले.

मागील वर्षापासून या व्यावसायिक शिक्षकांच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष तसेच करोना महामारीच्या संकटात या शिक्षकांच्या वाढलेल्या अडचणी गंभीर आहेत. या शिक्षकांना पूर्वी 12 महिन्यांचे वेतन अदा केले जात होते. सन 2018-19 पासून शिक्षण विभागाने कपात सुरू केल्याने 10 महिन्यांचे वेतन या शिक्षकांच्या हातात पडत आहे. मिळणारे वेतनही वेळेत मिळत नसल्याने या शिक्षकांची होत असलेली आर्थिक कुंचबणा लक्षात घेऊन शिक्षकांना दरमहा वेतन करण्याची मागणी केली आहे.

शासनाने व्यवसाय शिक्षणाच्या विषयांना मुख्य विषय म्हणून मान्यता दिलेली आहे. या सर्व शिक्षकांना इतर मुख्य विषयांच्या शिक्षकांप्रमाणेच नियमित सेवेत सामावून घेऊन वेतन, भत्ते, पगारवाढ आणि रजेच्या सवलती देण्याबाबत गांभिर्याने विचार करुन या शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार विखे पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com