संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

पतसंस्थांमुळेच राज्याच्या अर्थकारणाला गती मिळत आहे. राज्यातील सहकार चळवळ सावकारी नष्ट करण्याचे काम करत आहे.

पतसंस्था फेडरेशनचे काका कोयटे व सर्व पदाधिकारी खुप तळमळीने काम करत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करत आहे. पतसंस्थांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी सरकारने चांगली यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. एव्हढेच नव्हेतर सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री थोरातांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन मार्ग काढू. महाआघाडीचे सरकार पतसंस्थांचे सर्व प्रश्न निश्चित सोडवेल, असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

संगमनेर येथे राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशन व नगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्यावतीने नाशिक विभागातील पतसंस्थांच्या सहकर संवाद कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी आ. सुधीर तांबे बोलत होते. प्रथम सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय सहनिबंधक राजेंद्र शहा यांच्याहस्ते झाले. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, पतसंस्था स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, पतसंस्था फेडरेशचे महासचिव शांतीलाल सिंगी, कर्याध्यक्ष राजुदास जाधव, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, खजिनदार दादाराव तुपकर आदींसह नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पतसंस्थांचे सुमारे 700 प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले, कर्ज वसुलीच्या बाबतीतही कायद्यात सुधारणे होणे अवश्यक आहे. ठेवींना विमा संरक्षण नसल्याने नगरमधील स्थैर्यनिधी सारख्या योजना सर्व जिल्ह्यात राबवल्या गेल्या पाहिजेत. पतसंस्था फेडरेशनने मांडलेल्या सर्व मागण्या अत्यंत रास्त आहेत. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करणे योग्य आहे. मात्र राज्यातील पतसंस्थांना आंदोलन करण्याची वेळ येत कामा नये यासाठी मी स्वत: महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे सर्व समस्यांचा पाढा वाचणार आहे.

यावेळी काका कोयटे म्हणाले, राज्यातील सहकारी पतसंस्थांमधून आता लवकरच स्वत:चे सहकार क्रेडीट कार्ड, मोबाईल क्यूआर कोड मार्फत व्यवहार अशा अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सेवा ग्राहकांसाठी सुरु करणार आहे. मात्र राज्य सरकार कडून आम्हाला सहकार्य मिळत नाहीये. बँकांच्या ठेवींना विमा संरक्षण आहे, मग पतसंस्थांच्या ठेवींना का नाही? पतसंस्थांवर नियामक मंडळ लादून अंशदान वसूल करण्याचा जाचक निर्णय सरकारने घेतला आहे.

त्यास आमचा तीव्र विरोध आहे. पतसंस्थांच्या अनेक मागण्यांकडे वर्षानुवर्ष प्रत्तेक सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता शांत न बसता सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही बेमुदत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाच्या धर्तीवर राज्यातील सर्व पतसंस्था येत्या एप्रिल महिन्यात मुंबईत बेमुदत मोठे आंदोलन करणार आहे. राज्यातील हजारो पतसंस्थांचे लाखो पदाधिकारी व कर्मचारी मंत्र्यालायावर धडक देणार आहे. आ. सुधीर तांबे हे पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांनी आमच्या समस्या सरकार पर्यंत पोहचाव्यात.

यावेळी सहनिबंधक राजेंद्र शहा यांनी बहुमोल मार्गदर्शन करत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. फेडरेशन कार्याध्यक्ष राजुदास जाधव यांची यवतमाळ जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल तसेच उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव यांची बुलढाणा जिल्हा भाजपच्या सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी प्रास्ताविकात आंदोलनात्मक भूमिका मांडली.

पतसंस्था फेडरेशनच्या व्यवस्थापिका सुरेखा लवांडे यांनी सूत्रसंचालन केले, स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी आभार मानले. यावेळी फेडरेशचे संचालक गोविंद अग्रवाल, अॅड. अंजली पाटील, नारायणराव वाजे, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष साबाजी गायकवाड, नंदुरबार फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. कांतीलाल टाटीया, धुळे फेडरेशनचे अध्यक्ष अरुण महाले आदी उपस्थित होते. संगमनेर तालुका फेडरेशनचे अध्यक्ष बापूसाहेब टाक व संग्राम पतसंस्थेचे अध्यक्ष राणीप्रसाद मुंदडा यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.