
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
निरव मोदी, अग्रवाल, छेडा, शहा विनोद खन्ना अशा आ. पवार यांच्या मित्र परिवाराच्या जमिनी तिथे आहेत. यामुळे आ. पवार यांचा त्याच जागेवर एमआयडीसी करण्याचा घाट घातल्याचा आरोप करत कर्जत एमआयडीसीची सुरुवात मी केली, आता शेवट सुध्दा मीच करणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. राम शिंदे यांनी येथे केले.
कर्जत येथे एमआयडीसी मुद्द्यावरून आमदार प्रा.राम शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,सन 2015-16 ला मीच कर्जतमध्ये एमआयडीसी व्हावी याबाबत पुढाकार घेतला होता. त्याची जागा निश्चितीबद्दल सुद्धा जे मेमोरंटम किंवा प्रोसिजर उद्योग विभागाकडे आहे, ते उद्योग मंत्र्यांनी सभागृहामध्ये वाचून दाखवलं. रोहित पवार यांनी जी जागा प्रस्तावित केली आहे. त्या जागेवरती निरव मोदी, अग्रवाल, छेडा, शहा विनोद खन्ना आणि आ. पवार यांच्या इतर मित्रांच्या जागा आहेत.
म्हणूनच ते म्हणतात याच जागेवर एमआयडीसी व्हावी असा हट्ट ते धरत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. कर्जत एमआयडीसी मुद्द्यावर कुठे पाहिजे तिथे चर्चा करायची माझी तयारी आहे. तुम्ही निरव मोदीसारख्या दलालांनी कवडीमोल किमतीने शेतकर्यांकडून घेतलेल्या जमिनींचा मावेजा मिळवण्यासाठी करत आहात हे आता जनतेला कळून चुकलं आहे. असा घणाघाती हल्ला आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांवर केला.
श्रीराम कारखान्यातील स्थानिकांना काढले
पाच सहा महिन्यांपूर्वी रोहित पवारांनी हळगाव येथील जय श्रीराम साखर कारखाना विकत घेतला. कारखाना विकत घेतल्याबरोबर त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांना कामावरून काढून टाकले. ते म्हणतात नवयुवकांना मी रोजगार देणार आहे, तरुणांच्या हाताला काम दिणार आहे, मग जे स्थानिक लोक कामाला होते त्यांना का काढून टाकले? असा सवाल प्रा. राम शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.