विजेच्या वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी 70 कोटीच्या कामांना मंजूरी

आ. शंकरराव गडाख यांची माहिती
विजेच्या वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी 70 कोटीच्या कामांना मंजूरी

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांच्या विजेची वाढीव गरज भागविण्यासाठी व वीज वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी 70 कोटीच्या विविध कामांना मंजूरी मिळाली असून त्यात विजेची नवीन चार उपकेंद्रे व आठ उपकेंद्रांची क्षमता वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांचा समावेश असल्याची माहिती माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी दिली.

अधिक माहिती देतांना आ.गडाख पुढे म्हणाले,नेवासा तालुका हा क्षेत्रफळाने मोठा व बागायती तालुका आहे. त्यामुळे विजेची गरजही जास्त आहे. ती पूर्ण करण्याच्या बाबतीत तालुक्यातून अनेक शेतकरी व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या.त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने नेवासा, नाशिक व मुंबई येथील अधिकाऱ्यांची एकत्रित मिटिंग घेऊन हे सर्व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तालुक्याचा आराखडा तयार केला होता, त्याला आता मंजुरी मिळाली असल्याचे आमदार गडाख यांनी सांगितले.

नवीन मंजूर झालेल्या विजेच्या उपकेंद्रांमध्ये घोगरगाव, पाचेगाव, तामसवाडी व नेवासा खुर्द चा समावेश असून त्याशिवाय सध्या कार्यरत असणाऱ्या आठ उपकेंद्रांमध्ये क्षमता वाढीला मंजुरी मिळाली आहे. त्यात माका, तेलकुडगाव, बेलपिंपळगाव, खडका, उस्थळ खालसा, घोडेगाव, गेवराई व करजगाव या उपकेंद्रांचा समावेश आहे. तेथे जादा क्षमतेचे पावर ट्रान्सफार्मर बसवल्यामुळे या उपकेंद्रांच्या परिसरात विजेसाठी वाढीव लोड लक्षात घेऊन त्याची गरज भागविण्याच्या दृष्टीने त्याची मदत होणार आहे. तसेच या उपायोजना केल्यामुळे विजेच्या वितरण व्यवस्थेत सुधारणा होणार असून परिसरातील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना सध्या विज पुरवठ्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या सोडविण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

तसेच वीज पुरवठ्यात सातत्य राहण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी लिंक लाईनची कामे, गावठाण फिडर स्वतंत्र करून नवीन रोहित्र बसविण्याची कामे होणार आहेत. कृषी वीज जोडणी धोरण 2020 या योजनेत घोगरगाव व धनगरवाडी या वीज उपकेंद्रांसाठी सुमारे आठ कोटी रुपये निधी यापूर्वीच मंजूर होऊन या उपकेंद्राच्या उभारणीचे काम लवकरच सुरु होईल अशी माहिती आमदार गडाख यांनी दिली.

सद्यस्थितीला तालुक्यात विजेची गरज वाढलेली असल्याने सध्याच्या उपकेंद्रांची क्षमता अपुरी पडत होती. लोड वाढल्यामुळे ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे. विजेचा पुरवठा नियमित होत नाही तसेच तो पुरेशा दाबाने होत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांच्या विजेबाबत ज्या तक्रारी होत्या त्याचे निराकरण होण्यास मदत होणार असल्याने वरील उपकेंद्रांच्या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com