कामकाजात सुसुत्रता आणून कामे मार्गी लावा

आ. जगताप यांच्या मनपा अधिकार्‍यांना सूचना
आमदार संग्राम जगताप
आमदार संग्राम जगताप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून आणला आहे. मात्र प्रशासनाच्या नियोजन शून्य गलथान कारभारामुळे शहर विकासाचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. दैनंदिन कामकाजाचे नियोजन नसल्यामुळे शहरामध्ये ठीक ठिकाणी कचर्‍याचे ढीग दिसून येत आहेत. तसेच विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

महापालिकेचे दैनंदिन कामकाज सुरळीत होण्यासाठी त्या त्या विभागामध्ये सक्षम अधिकारी व इंजिनीयर यांची तातडीने भरती करून कामकाज सुरळीत करून जलदगतीने सुरू करा, असे आदेश महापालिकेतील अधिकार्‍यांच्या बैठकीत आ. संग्राम जगताप यांनी दिले.

नगर शहरातील दैनंदिन व विकासाचे प्रश्न जलद गतीने मार्गी लावण्यासाठी आ. जगताप यांनी मनपा अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन सूचना दिल्या. यावेळी आयुक्त डॉ.पंकज जावळे, उपमहापौर गणेश भोसले, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे, नगरसेवक अविनाश घुले आदी उपस्थित होते. आ. जगताप म्हणाले, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामकाजाचे नियोजन करावे. सावेडीतील नाट्यसंकुलनासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी प्राप्त करून आणला मात्र ठेकेदार व प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे नाट्यसंकुलनाचे काम बंद आहे.

याचबरोबर महापालिकेच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या हॉस्पिटलचे कामही संथगतीने सुरू आहे. याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर मर्गी लावावे तसेच शहरातील मंजूर रस्त्याची कामे लवकरात लवकर हाती घ्यावी. इलेक्ट्रिक विभागामध्ये सक्षम अधिकार्‍याची नियुक्ती करावी. शहर विकासाचे प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.येत्या आठ दिवसांत सर्व प्रश्न मार्गी लावून कामकाजामध्ये सुसूत्रता आणावी असे आदेश यावेळी देण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com