आ. जगताप यांनी संकटकाळात लोकांना मदत केली : पवार
सार्वमत

आ. जगताप यांनी संकटकाळात लोकांना मदत केली : पवार

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

संकटकाळामध्ये लोकांच्या सेवेला अत्यंत महत्त्व आहे. आमदार संग्राम जगताप यांनी करोना संकटाच्या काळात गरजूंना मदत करण्याची मोठी कामगिरी केली आहे. आयुर्वेद कॉलेजमध्ये करोना सेंटर उघडून अल्पदरात चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

आयुर्वेद कॉलेज येथील गुरू आनंद कोविड सेंटरला आ. पवार यांनी भेट दिली. यावेळी आ. जगताप, माजी नगरसेवक संजय चोपडा, मर्चंट्स बॅकेचे संचालक अमित मुथा, कमलेश भंडारी, अर्बनचे संचालक शैलेश मुनोत, धनेश कोठारी, रोशन चोरडिया, राजेंद्र फाळके, अभिजीत खोसे, योगेश गलांडे आदी उपस्थित होते.

आ. पवार म्हणाले, सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास समाजामध्ये अनेक लोक पुढे येऊन मदत करतात. करोनाच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे रुग्णही मोठ्या प्रमाणात निघत आहेत. घाबरून न जाता योग्य उपचार घेऊन करोना आजारावर आपण सर्वांनी मात करायची. आयुर्वेद कॉलेजला ऐतिहासिक वारसा आहे. या कॉलेजमध्ये गुरु आनंद कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवा करून समाजामध्ये एक दिशादर्शक काम ठरेल.

आमदार जगताप म्हणाले, सकारात्मक दृष्टिकोनातून व सामाजिक बांधिलकीतून काम करणे गरजेचे आहे. आजचा युवक यासाठी पुढे येत आहे. त्या माध्यमातून समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहोचत आहे. आयुर्वेद कॉलेजमध्ये 30 बेडचे गुरू आनंद कोविड सेंटर सुरू आहे. या संकटावर मात करण्यासाठी बडी साजन येथे लवकरच 100 बेडचे कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com