उल्लेखनिय कामगिरी केलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई अन्यायकारक - आ. पवार

कर्जत-जामखेड अधिकारी निलंबन, बदल्यांचा केला निषेध
आ . रोहित पवार
आ . रोहित पवार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत-जामखेड तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकार्‍यांवर केलेली निलंबनाची व बदलीची कारवाई अन्यायकारक आहे. याअधिकार्‍यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा लेखाजोखा सविस्तर वाचा असे सांगत आमदार रोहित पवार यांनी अधिकार्‍यांवरील कारवाईचा निषेध केला.

कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले व कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे नुकतेच निलंबन करण्यात आले तर जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते आणि कर्जत नगर पंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे.

कर्जत व जामखेड तालुक्यात माझी वसुंंधरा, मिशन वात्सल्य मोहीम, विशेष सहाय्य योजना लाभार्थी शोध मोहीम, पालक मंत्री शेत पाणंद रस्ते अशा विविध कामांमध्ये महत्वाची भूमिका बजावत या अधिकार्‍यांनी लाभार्थ्यांचा एक नवा विक्रम प्रस्थापित के करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तसेच कर्जत व जामखेड दोन्ही तालुक्यांत गतवर्षी आणि यावर्षी मिळून एकत्रित 33 हजारांहून अधिक इष्टांक संपवला आहे, यंदा एकाच वेळी 20 हजारांच्या आसपास नागरिकांना शिधापत्रिका वाटप करण्याचा उपक्रम काही महिन्यांपूर्वीच राबवण्यात आला होता.

या सोबतच कोरोना महामारी असताना या अधिकार्‍यांनी सामाजिक भान ठेवून केलेली कामे देखील विसरून चालणार नाहीत. या अधिकार्‍यांनी लोकप्रतिनिधींसोबत समन्वय साधून सातत्याने मतदारसंघाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले. परंतु राजकीय फायद्यासाठी कार्यक्षम अधिकार्‍यांवर केलेली कारवाई कितपत योग्य आहे. असा सवाल आता जनसामान्यांमधून विचारला जात आहे, असे पवार म्हणाले.

विधान परिषदेमध्ये मतदारसंघातील नागरिकांच्या हिताचा एकही प्रश्न राम शिंदे यांनी मांडला नाही. त्यांनी फक्त राजकीय द्वेशातून अधिकार्‍यांवर कारवाई करा आणि कामे थांबवा याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही.

- रोहित पवार,(आमदार कर्जत-जामखेड)

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com