नद्यांच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार - पवार
सार्वमत

नद्यांच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार - पवार

Arvind Arkhade

कर्जत|तालुका प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील सीना, भीमा व कुकडी या नद्यांच्या पाण्याचे नियोजन भविष्य काळामध्ये करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी निमगाव गांगर्डा येथे केले.

निमगाव गांगर्डा येथील सीना धरण 35 वर्षांनंतर प्रथमच जुलै महिन्याच्या अखेरीस भरले आहे. या भरलेल्या पाण्याचे जलपूजन आ. पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, परमवीर पांडुळे, सरपंच नितीन खेतमाळीस, बाबासाहेब गांगर्डे, प्रकल्पाधिकारी बाजीराव थोरात, सरपंच भागचंद गांगर्डे, रघुआबा काळदाते आदी उपस्थित होते.

आ. पवार म्हणाले, यापूर्वी पाण्याचे नियोजन कसे झाले. यावर चर्चा करण्यापेक्षा आपण भविष्यामध्ये सीना धरण असो, भीमा असो किंवा कुकडी प्रकल्प असो या सर्व पाण्याचे योग्य नियोजन करू आणि पाण्याचे नियोजन अशा पद्धतीने करू की, सर्वांना पाणी मिळेल.

सध्या आपण प्रकल्पातील पाण्याच्या धारा सीना धरणांमध्ये दोन वेळा पाणी कसे आले. याचे नियोजन केले आहे. हे भविष्यात तीन वेळा पाणी कसे देता येईल याचे नियोजन करू, शिवाय सीना धरणाच्या अंतर्गत येणार्‍या सर्व कालव्यांचे दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

आता धरण भरले आहे, पाऊस राहिलेला आहे, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आणखी पाणी येईल. त्याचेही नियोजन आपण योग्य पद्धतीने करू. या धरणावरील बीड जिल्ह्याला देखील आपल्याला पुरेसे पाणी देण्याबाबत नियोजन करता येईल. यामुळे या पुढील काळात सर्व पाण्याचे कसे नियोजन योग्य राहील यासाठी प्राधान्य देऊ आणि सर्व शेतकर्‍यांना पुरेसे पाणी देऊ, असे यावेळी रोहित पवार यांनी सांगितले.

सर्व प्रकल्पांचे पाणी क्षेत्रातील शेतकर्‍यांना पुरेसे देता यावे. यासाठी आपण पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह अनेक बैठका घेऊन त्याचे चांगले नियोजन करण्यावर भर दिला आहे. पुढील काळामध्ये हे सर्व दिसून येईल, असेही आ. रोहित पवार म्हणाले. यावेळी प्रास्ताविक पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे यांनी केली

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com