कर्जत |प्रतिनिधी| Karjat
कर्जत - जामखेड मतदारसंघात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) मंजूर करून आणल्यानंतर याठिकाणी प्रत्यक्षात उद्योग सुरू करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रमुख उद्योगपतींच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. यामुळे या एमआयडीसीत उद्योग सुरू होण्याची प्रक्रीया सुरू झाल्याची चर्चा आहे.
कर्जतच्या एमआयडीसीचा विषय अंतिम टप्प्यात असून तो तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. येथे उद्योग आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची मागणीही आ. पवार यांनी केली आहे. दरम्यान आ. पवार यांनी खा. शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत टीपीसीएल, जिंदाल, एशियन पेंटस् या कंपन्यांच्या मालकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पॅकेजिंग उद्योगात देशातील आघाडीची पॅकेजिंगचे काम करणारी ही कंपनी आहे. या कंपनीचे मालक व व्यवस्थापकीय संचालक साकेत कनोरीया यांची आ. रोहित पवार यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
जिंदाल स्टील ही देशातील तिसर्या क्रमांकाची खासगी पोलाद उत्पादक कंपनी आणि रेल्वेचे उत्पादन करणार्या कंपनीचे मालक आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांचीही आ. पवार यांनी भेट घेऊन मतदारसंघातील येथील एमआयडीसीत उद्योग सुरू करण्याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याशिवाय मुंबईत मुख्यालय असलेली एशियन पेन्टस् लि.या कंपनीशी सबंधित अमित चोक्सी यांच्याशीही चर्चा केली आहे.
विविध उद्योजकांशी बोलणी करून त्यांना लागणार्या पायाभूत सोयी-सुविधा, मनुष्यबळ याबाबत चर्चा करणं हे माझे कर्तव्य आहे. त्यासाठी देशभरातील अनेक उद्योजकांशी माझी यासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू आहे. खासदार शरदचंद्र पवार यांचेही याबाबत व्यक्तीशः लक्ष आहे. शिवाय राज्य सरकारकडूनही याबाबत सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- आ. रोहित पवार