आ. रोहित पवारांकडून झेडपीत डोकवण्यास सुरूवात
सार्वमत

आ. रोहित पवारांकडून झेडपीत डोकवण्यास सुरूवात

शाळा खोल्यांचा निधी सार्वजनिक बांधकामकडून झेडपीकडे आणू

Dnyanesh Dudhade

Dnyanesh Dudhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा अनुभव असणार्‍या आ. पवार यांनी नगर जिल्हा परिषदेत डोकावण्यास सुरूवात केल्याने जिल्ह्यातील ‘राजकारण्यां’चे ते लक्ष वेधून घेणार आहेत.

दरम्यान, साधारण 8 ते 10 महिन्यांपासून पडून असणारा शिर्डी संस्थांचा प्राथमिक शाळा खोल्यांचा 10 कोटींचा निधी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे खेचून आण्याचे आश्वासन त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे.

शुक्रवारी सकाळी आ. रोहित पवार यांनी जिल्हा परिषद गाठत कर्जत-जामखेड तालुक्यातील झेडपीच्या अखत्यारितील प्रलंबित विषय आणि प्रश्नांबाबत अधिकार्‍यांची बैठक घेतली. कोणालाही कल्पना न देता आ. पवार तिकडे जिल्हा परिषदेत पोहचले. यावेळी जिल्हा परिषदेत उपस्थित असणार्‍या निवडक खाते प्रमुखांसोबत त्यांनी बैठक घेतली. ही माहिती अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष रावसाहेब पाटील शेळके यांना मिळताच ते जिल्हा परिषदेत पोहचले.

त्यानंतर महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीराताई शेटे आल्या. दरम्यान, आ. पवार यांनी विभागनिहाय जिल्हा परिषदेकडील मतदारसंघातील प्रश्न मांडले. ते सोडविण्यास राज्य पातळीवर अडचण असल्यास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्राव्दारे ते कळवा आणि त्याची एक प्रत मला द्या, यासंदर्भात मंत्रालय आणि राज्य सरकार पातळीवर पाठपुरावा करून ते सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कर्जत-जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेची 184 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांची पदे रिक्त असून ते प्राधान्याने भरण्याची सूचना त्यांनी अधिकार्‍यांना केली. तसेच मतदारसंघातील प्रलंबीत प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोलंकी, आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, डॉ. सुनील तंबारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणचे प्रभारी प्रकल्प संचालक परिक्षित यादव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

आ.पवाराच्या हस्तक्षेपाला विरोध करणार ?

आ. पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या माध्यमातून नगर जिल्हा परिषदेच्या कामात लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. यामुळे जिल्हा परिषद सत्ताधारी गटाला त्याचा राजकीय फायदा होऊन विकास कामांना गती येणार आहे. मात्र, त्यावर विरोधी भाजपचा गट काय भूमिका घेणार, आ. पवार यांच्या जिल्हा परिषदेतील हस्तक्षेपाला विरोध करणार की आ. पवार यांच्याकडे शांतपणे पाहण्याची भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com