आ. शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

जामखेडमधील गुन्हेगाराचे कृत्य || नगरसेवकालाही केला फोन
आ. राम शिंदे
आ. राम शिंदे

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

माजी मंत्री आ. राम शिंदे यांना फेसबुक या सोशल मीडियाव्दारे तसेच एका नगरसेवकास फोन करून घरात घुसून जीवे मारण्याची धमकी जामखेड येथील सराईत गुन्हेगार सागर गवसणे याने दिली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, धमकी देणारा तरुण आ. रोहित पवार यांचा समर्थक असल्याचे सांगण्याात येते.

आ. शिंदे यांना घरात घुसून मारण्याची धमकी मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकी प्रकरणी जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक तथा जामखेड सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष अमित चिंतामणी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, चिंतामणी हे 29 मे 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने कामाची तयारी करण्याकरिता श्रीक्षेत्र चोंडी येथे गेले होते.

त्यावेळी सागर गवसणे याच्या मोबाईलवरून त्यांना फोन आला. तो म्हणाला, तुम्ही आ. शिंदे यांच्या जवळ आहात, त्यांना जुळवून घ्यायला सांगा, नाहीतर पाहून घेईन. त्यानंतर चिंतामणी यांनी आ. शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व सागर गवसणे याने फोन केल्याची माहिती दिली. दरम्यान, सागर गवसणे याने फेसबुकवरील मैत्रीग्रुप या अकाउंटवरून लाईव्ह करत आ. शिंदे व काही अपरिचित व्यक्तींचे नाव घेऊन तुम्हास घरात घुसून मारीन अशी धमकी देत असल्याचे दिसून आले.

यामुळे दोन पक्षांमध्ये, लोकांमध्ये तेढ निर्माण होईल असा आक्षेपाहार्य मजकुर असलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगार सागर गवसणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गवसणे विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी, शिंदे समर्थकांनी केली आहे.

आ. शिंदे यांना धमकी देणारा सागर गवसणे याच्याशी आपला काहीही सबंध नाही. त्याने सोशल मीडियावर माझ्या सोबतची सेल्फी टाकल्याचे सांगीतले जाते. परंतु माझ्यासोबत सर्व युवक सेल्फी घेतात. यामुळे सर्वांना लक्षात ठेवता येत नाही.

- आ. रोहित पवार

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com