
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्याचे विभाजन व नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर झालेच पाहिजे, अशी मागणी भाजप माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी केली आहे. आपण पालकमंत्री असताना त्यावेळी विरोधात असलेले राधाकृष्ण विखे यांनी जिल्हा विभाजनाला पाठिंबा दिला होता, असे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले. यामुळे आता आ. शिंदे यांच्या जिल्हा विभाजन आणि नामांतराच्या मागणीमुळे भाजपमधील मतभेद उघड झाले आहेत.
आ. शिंदे यांनी सोमवार (दि.9) रोजी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना विभाजन व नामांतराविषयी भूमिका स्पष्ट केली. आपण पालकमंत्री असतानाच जिल्हा विभाजनाचा विषय अंतिम टप्प्यात आला होता. आपण यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जिल्हा भौगोलिकदृष्ट्या, क्षेत्रफळाच्यादृष्टीने मोठा आहे.
उत्तरेचा स्वतंत्र जिल्हा करताना मुख्यालयाचे ठिकाण कोणते असावे याबद्दल विचार झाला नव्हता. याचा निर्णय तत्कालीन सरकारवर सोपवला होता. मात्र, जिल्हा विभाजनासाठी त्यावेळी सुमारे 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता तो वाढणार आहे, जिल्हा विभाजन व नामांतराबद्दल भाजप पक्ष अधिकृत भूमिका योग्य वेळ व काळ आल्यावर स्पष्ट करेल, असेही आ. शिंदे यांनी सांगितले.
नगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याचा विषय हा केवळ धनगर समाजापुरता मर्यादित नाही, तर तो हिंदुत्वाशी निगडित आहे. हिंदू धर्म अडचणीत असताना अहिल्यादेवींनी बारा ज्योतिर्लिंग, काशीविश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांचे कार्य एका जातीपुरते मर्यादित नव्हते, तर ते श्रेष्ठ असे कार्य होते. नामांतराचा विषयासंदर्भात आ. गोपिचंद पडळकर यांनी आपल्याशी चर्चा केली होती. लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे सांगत जिल्ह्यातील नेत्यांना टोला लगावला. तसेच विकासाच्यादृष्टीने जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
नाशिक पदवीधरसाठी अनपेक्षित उमेदवार
विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. याकडे लक्ष वेधले असता आ. शिंदे म्हणाले, उमेदवारी जाहीर होण्यास विलंब झाला आहे. ही जागा जिंकण्यासाठीच तो विलंब झाला आहे. उद्यापर्यंत उमेदवारी जाहीर होईल. भाजपने मोठी नोंदणी करत आघाडी घेतली आहे. डॉ. राजेंद्र विखे, धनंजय विसपुते व मीनाक्षी पाटील असे तीन उमेदवार शर्यतीत आहेत. मात्र यापेक्षा वेगळे नाव येऊ शकते.
आ. रोहित पवार यांची निवड धक्कादायक
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांची निवड करण्यात आली, याबद्दल बोलताना आ. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला मोठी परंपरा, वारसा आहे. संघटनेने अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. त्या ऐवजी संघटनेच्या अध्यक्षपदी आपला कोणीतरी नातेवाईक आहे, म्हणून त्याची निवड केली जाते. यावरून खेळात कसे राजकारण चालते व खेळाची वजाबाकी केली जाते, हे दिसते. या सर्व बाबी धक्कादायक आहेत.
कर्जत-जामखेडमध्ये पुन्हा मीच उमेदवार
कर्जत-जामखेड विधानसभेच्या आगामी निवडणुकीत पुन्हा मीच उमेदवार आहे. ही जागा मीच लढवणार, असा दावाही आ. शिंदे यांनी केला. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिंदे यांची नुकतीच विधान परिषदेवर नियुक्ती करत भाजपने त्यांचे पुनर्वसन केले आहे. मात्र कर्जत-जामखेडमधून पुन्हा आपणच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.