कामे चांगली केलीच तर घाबरता कशाला

आ. शिंदेंचा आ. पवारांना उलट सवाल
कामे चांगली केलीच तर घाबरता कशाला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कर्जत-जामखेडमधील ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता पाणंद रस्ते योजनेतून कामे केली गेली. ग्रामपंचायतने आराखडा एक दिला मंजूर दुसरा झाला आणि तिसर्‍या ठिकाणी कामे झाली. जी कामे झाली ती लोकांच्या उपयोगाची नाहीत. समाज माध्यमावर तुम्ही काहीही दावा करू शकता. कामे चांगली झाली असेल तर तपासून घेऊ द्या. घाबरता कशाला? असा उलट सवाल आ. राम शिंदे यांनी कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांना केला आहे.

कर्जत- जामखेड मतदारसंघातील पाणंद रस्ते योजनेतून झालेल्या कामातील 20 कोटींच्या अपहार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सोमवारी आ. शिंदे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांना पत्रकारांनी चौकशी संदर्भात विचारले असता ते म्हणाले, निविदा न करता कंत्राटदाराला धनादेश दिल्याचे मी पहिल्यांदाच पाहिले आहे. पाणंद रस्त्यात 20 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सूडबुद्धीने चौकशी करण्याचे काही कारणच नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ व नियोजनचे खाते असल्यामुळे व रोजगार हमी योजनेचे खाते संदीपान भुमरे यांच्याकडे असल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले असल्याचे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले.

आ. पवार यांची अगोदरच एक ईडी मार्फत चौकशी सुरू होती. ही चौकशी दुसरी आहे. ईडी ही त्रयस्थ संस्था असून, या संस्थेवर केंद्राचा व राज्याचा कुठलाही दबाव नसतो. सूडबुद्धीने नव्हे तर अभ्यासाअंती ईडीने ही चौकशी सुरू केली असेल, असेही आ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

रोहित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे. तर दुसरीकडे, रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा हजर होते. जवळपास 10 ते 15 मिनिटांची ही भेट झाली. भाजपाच्या मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपानंतर रोहित पवारांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा एक निर्णय मांडला होता. युरोपमध्ये जगदंबाची तलवार आहे, अनेक अशा वस्तू बाहेर आहेत. त्या भारतात कशा आणाव्यात, याबद्दल आम्ही चर्चा केली. तसंच पोलिसांच्या सुट्टीबद्दल आम्ही चर्चा केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com