माझे कुटुंब माझी जबाबदारी...

बाकी सगळे गुवाहाटी : आ. शिंदे
माझे कुटुंब माझी जबाबदारी...

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणवणार्‍या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री आणि आमदार गुवाहाटीला पोहचल्याने, राज्यात आता जनतेच्या मनातील सरकार येणार आहे. या नव्या सरकारमध्ये जिल्ह्यातील तीन मंत्री करावेत, असा ठरावच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केल्यामुळे चिंताच राहिली नाही. माजी मंत्री कर्डिले जो ठराव करतात, तो भाजप तंतोतंत अंमलात आणते. माझ्या उमेदवारीसाठी कर्डिलेंचा ठरावच कामी आला असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे नूतन आमदार प्रा. राम शिंदे यांनी केले.

विधान परिषदेवर निवडून आल्याबद्दल आ. शिंदे यांचा सत्कार सोहळा जिल्हा भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे, आ. मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, चंद्रशेखर कदम, स्नेहलता कोल्हे, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, विश्वनाथ कोरडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, वसंत लोढा, महिला जिल्हाध्यक्षा आश्विनीताई थोरात आदी उपस्थित होेते.

आ. शिंदे म्हणाले, नगर जिल्हा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा म्हणून सर्वश्रृत आहे. माजी आमदारांमधून आमदार होण्याची संधी या जिल्ह्यात फार कमी लोकांना मिळाली. त्यामध्ये माझा समावेश आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये राज्यात पुन्हा एकदा जनतेच्या मनातील सरकार येणार असल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप सर्व ताकदीनिशी पुन्हा एकदा क्रमांक एकचा पक्ष असेल. राज्यसभेच्या वेळी मला उमेदवारी देण्याचे पक्ष नेतृत्वाने ठरविले होते. मात्र, तिनही जिल्हाध्यक्षांनी विधान परिषदेचा ठराव केला. तो ठराव वरिष्ठांनी मान्य करत मला आमदार केले. संघटनेच्या ताकदीमुळे हे शक्य झाल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले तर आभार शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी मानले. यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, सुवेंद्र गांधी, सचिन पोटरे, महेश तवले, अँड.विवेक नाईक, तुषार पोटे, दिलीप भालसिंग, दत्तात्रय महाडिक, अ‍ॅलड.युवराज पोटे, शांतीलाल कोपनर, सुनिल रामदासी, महेश नामदे, बाबासाहेब सानप, अंजली वल्लाकट्टी, सोनाली नाईकवाडी, सुनिल यादव आदिंसह भाजपच्या विविध आघाडी, मोर्चाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

मला माजी ठेवू नका - कर्डिले

याप्रसंगी कर्डिले म्हणाले, मी तोंड पाहून भविष्य सांगतो, मला शिंदे आमदार होणार हे माहीत होते, म्हणूनच मी ठरावाचा आग्रह धरला आणि ते आमदार झाले. आता सरकारही बदलणार आहे. माझ्या ठरावाची राज्य नेतृत्व दखल घेत असेल तर मी आजच नव्या सरकारमध्ये जिल्ह्याला तीन मंत्री मिळावेत, असा ठराव करतो. मंत्री झाल्यावर आमच्याकडेही लक्ष असू द्या, मी माजी आहे, मला माजीच ठेवू नका. असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

मी, आ. शिंदे एकच - आ. विखे

आ. विखे पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा वारसा असलेले राष्ट्रीय राजकारणात झोकून दिल्यामुळेच आ. शिंदे यांना विधान परिषदेची संधी मिळाली. श्रद्धा आणि सबुरीचे काम केल्यामुळे आपले यश कोणीही थांबवू शकत नाही, असे सांगून माझ्यात आणि आ. शिंदे यांच्यात भांडणे कोणीही लावू नये, आम्ही दोघेही एक आहोत, आमच्या भांडणावर दुकानदारी करणार्‍यांचे दिवस भरले आहेत. यावेळी आ. राजळे, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, प्रा. भानुदास बेरड, माजी आ.चंद्रशेखर कदम यांची भाषणे झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com